अनेक सेलिब्रिटींनाही करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात अतिप्रसंगाचा सामना करावा लागला आहे. मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग आणि वाईट अनुभव अनेकदा मुलाखतीतून सांगितले आहेत. एका मराठी अभिनेत्रीला १६ वर्षांची असताना ट्रेनमध्ये भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्याबरोबर घडलेला हा प्रसंग सांगितला. अतिप्रसंग करणाऱ्या व्यक्तीला अद्दल कशी घडवली याबाबतही अभिनेत्रीने सांगितलं.
अभिनेत्री राधिका देशपांडेने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्याबरोबर ट्रेनमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. राधिका म्हणाली, "मी १६ वर्षांची होते. ट्रेनमध्ये वरच्या बर्थवर झोपले होते. त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. माझ्याबरोबर ३ वर्षांनी लहान असलेला माझा भाऊ कल्याण होता. आणि त्याच्यापेक्षा लहान माझी छोटी बहीण होती. आम्ही तिघंच प्रवास करत होतो आणि मी १६ वर्षांची होती. चवरंगच्या प्रयोगांमध्ये मी नृत्यांगणा म्हणून काम करत होते. या दोघांना घेऊन मी अहमदाबादला चालले होते. आणि परत येताना त्याने सहज कुठेतरी स्पर्श करायचा प्रयत्न केला".
पुढे ती म्हणाली, "पहिल्यांदा मला वाटलं की मी झोपेत आहे. दुसऱ्यांदा लक्षात आलं की काहीतरी विचित्र होतंय. तिसऱ्यांदा मी त्याचा हातच पकडला, खाली उतरले आणि रात्री अडीच-तीन वाजता बोगीत तमाशा केला. एक म्हातारा माणूस होता, एक कपल होतं त्यांनी मला सो जाओ सो जाओ असं म्हटलं. मला रात्रभर झोप आली नाही. तो मुलगा तिथेच होता आणि त्याचा मित्रही होता. तो मुलगा आणि मित्र घाबरले होते. मला हे सहनच होत नव्हतं. हे माझ्याबरोबरच का झालं, मी का आले, मग माझ्या आईबाबांनी मला एकटं का पाठवलं, मग हे असं का होतंय...माझा भाऊ तेव्हा झोपला होता. मग मी त्याला सकाळी सहा वाजल्यानंतर उठवलं. त्याला सगळा प्रसंग सांगितला."
या प्रसंगानंतर अवघ्या १६ वर्षांची राधिका अस्वस्थ झाली होती. तिने त्या मुलाला चांगलीच अद्दल घडवली. याबाबत सांगताना ती म्हणाली, "माझा लहान भाऊ १२-१३ वर्षांचा. मी त्याला म्हटलं कल्याण मी त्या मुलाला झापड मारणार आहे. आणि मी मारल्यानंतर तू त्याला मारायचं...मग मी त्याला कानफाटात लगावली. आपल्या समाजात कसे लोक असतात पाहा. आजूबाजूचे लोक म्हणायला लागले दीदी रहने दो. मी त्यांना सांगितलं याने माझ्याबरोबर अतिप्रसंग केला आहे. याला आता खाली उतरवा. मग टीसीला बोलवण्यात आलं. त्यानंतर पुढच्या स्टेशनला तो आणि त्याचा मित्र उतरला. मग मला एकदम शांत वाटलं".