'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील (rasika sunil). कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या रसिका अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर तिने आदित्य बिलागीसोबत (aditya bilagi) साताजन्माची गाठ बांधली. विशेष म्हणजे रसिकाच्या लग्नसोहळ्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत. त्यामुळेच चाहत्यांची उत्सुकता फार काळ न ताणता रसिकादेखील तिच्या लग्नातील काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अलिकडेच रसिकाने तिच्या लग्नातील वरातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या रसिकाने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाच्या वरातीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही हायलाइट्स दिसून येत आहेत. विशेष म्हणजे लग्नातील वऱ्हाडासोबत रसिका आणि आदित्यनेदेखील ताल धरल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनी 'गल मिठी, मिठी बोल' या गाण्यावर डान्स केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आदित्य आणि रसिकाचं लव्ह मॅरेज असून त्यांची पहिली भेट लॉस एंजलिसमध्ये झाल्याचं सांगण्यात येतं. आदित्य मुळचा औरंगाबादचा आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून तो लॉस एंजलिसमध्ये स्थायिक आहे. सुरुवातीच्या काळात रसिका- आदित्यची चांगली मैत्री होती. परंतु, या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं.