Ruchira Jadhav On Chhaava Movie: अलिकडेच अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत असलेल्या 'छावा' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला. मात्र, ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. अनेकांकडून या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच 'छावा'चा ट्रेलर रिलीज झाला सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करण्याचा एक सीन दाखवण्यात आला. याशिवाय संभाजी महाराजांचं नृत्यही पाहायला मिळतं. या सीनवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, 'छावा' मधील हा सीन वगळण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिली आहे. या वादावर आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.
'बिग बॉस' फेम अभिनेत्री रुचिरा जाधवने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकतीच खास स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिने लिहिलंय की, "मला आवडलं असतं माझ्या राजाला नवीन रुपात बघायला. ज्याने स्वत: च्या कारकिर्दीत एवढं सगळं झेललं, त्याला त्याचा आनंद, 'परंपरा जपत' साजरं करताना बघायला. "
पुढे अभिनेत्रीने लिहंलंय, "सिनेमा ही एक कला आहे. मुळात असे दृश्य दाखवण्यामागचा हेतू समजून न घेता चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे नकारात्मक गोष्टी पसरवणं हे किती योग्य आहे? खरंतर या अशा लोकांचा शिवाय त्या वृत्तीचा हेतू चेक केला पाहिजे." अशा परखड शब्दांत अभिनेत्रीने आपलं मत मांडलं आहे. सध्या रुचिरा जाधवच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारीला 'छावा' हा सिनेमा जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता देखीस शिगेला पोहचली आहे. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.