Join us

"अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा न चुकता..."; शिवानी रांगोळीची डॉ. वीणा देव यांच्यासाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:41 AM

शिवानी रांगोळेने मृणाल कुलकर्णी यांची आई डॉ. वीणा देव यांच्यासाठी लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे (shivani rangole)

लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे काही दिवसांपूर्वी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं. प्रसिध्द साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत, तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या. वीणा देव यांच्या निधनाने साहित्यविश्वातील तारा निखळल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. मृणाल कुलकर्णी यांची सून आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेने वीणा यांच्यासाठी लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

शिवानी लिहिते, "त्या नेहमी म्हणायच्या की आपल्या सवयी सारख्या आहेत. दोघींना सतत थंडी वाजत असायची म्हणून प्रवासात मोजे सोबत ठेवायची सवय, फुलांची आणि फुलं असणाऱ्या कपड्यांची प्रचंड आवड, पुस्तकांची प्रचंड आवड, दुपारची विश्रांती प्रिय!! ..बाहेर जेवायला गेलो तर शेअरिंग साठी नेहमी आमचा एक गट व्हायचा. मला शूटिंग करताना कुठलाही मराठी शब्द अडला तर मी हक्कानी कधीही फोन करायचे आणि त्या ही patiently मला शिकवायच्या. मध्यंतरी कागदावर कविता लिहून मला पाठवायच्या. माझी सीरियल अगदी हॉस्पिटल मध्ये सुद्धा न चुकता पाहायच्या! माझा आवाज बैलाच्या गळ्यातल्या घुंगरा सारखा आहे असं म्हणायच्या विराजसला."

शिवानी पुढे लिहिते, "गमतीशीर किस्से सांगताना डोळ्यांत चमक यायची त्यांच्या. गो.नी. दांचं भ्रमणगाथा वाचताना मी भारावून जाऊन फोन/msg करायचे तेव्हा खूप आनंद व्हायचा त्यांना. हा वारसा जपायचा आहे तुम्ही असं प्रेमानी सांगायच्या. त्यांच्यातला शांतपणा, सात्विक भाव आणि विचारांची श्रीमंती मृणाल ताई, मधुरा मावशी, विराजस आणि राधा मध्ये पुरेपूर जाणवते. त्यांचा कठीण काळ विसरून, फक्त आणि फक्त त्यांच्या ह्याच हसऱ्या आठवणी सोबत घेऊन आता जगायचे आहे. त्या बघत आहेत, त्यांना कौतुक असणार आहे म्हणून काम करण्याचा हुरूप यायचा आणि येईल, इथून पुढे नेहमीच!"

टॅग्स :शिवानी रांगोळेवीणा देवमृणाल कुलकर्णी