गेल्या महिन्यात एक मराठी टीव्ही कपल खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले. त्यांच्या प्रीवेडिंग शूटपासून ते लग्नाच्या फोटोंपर्यंत सगळ्याचीच चर्चा झाली. अभिनेत्रीचे लग्नातील आऊटफिटपासून ते तिच्या मेकअपपर्यंत सगळ्याचंच कौतुक झालं. मात्र लग्नाला काही दिवस शिल्लक असतानाच दोन्ही कलाकारांच्या मालिकेने निरोप घेतला. याचं त्यांना कुठेतरी वाईट वाटलं होतं. कोण आहेत ते कलाकार माहितीयेत का?
हे कपल आहे अभिनेता अंबर गणपुले (Ambar Ganpule) आणि अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar). दोघांनी २१ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली. दरम्यान लग्नाच्या आधी शिवानी सोनार 'तू भेटशी नव्याने' मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तर अंबर गणपुले 'दुर्गा' मालिकेत लीड हिरो होता. लग्नाला काही दिवस शिल्लक असतानाच मालिका संपली त्यावर राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शिवानी सोनार म्हणाली, "लग्नाची खरेदी करण्यासाठी मला ४ महिने लागले. तर अंबरची खरेदी फक्त एका दिवसात झाली होती. कारण तेव्हा आमचं दोघांचंही मालिकेचं शूटही चालू होतं. जसा वेळ मिळेल तसं आम्ही जाऊन थोडं थोडं घेऊन यायचो. शेवटचा दीड महिना आम्हाला जरा मोकळा वेळ मिळाला. तो गरजेचा होता. आधी आम्हाला असं वाटत होतं की शूट चालू असताना आपण लग्नाची तयारी करु. सगळं हँडल करु. पण नंतर इतकं काम होतं की वाटलं बरं झालं जरा वेळ मिळाला."
ती पुढे म्हणाली, "दोघांचीही मालिका लवकर संपली याचं आम्हाला सुरुवातीला थोडं वाईट वाटलं होतं. पण यामुळे आम्हाला लग्न एन्जॉय करता आलं. हे नसतं झालं तर कदाचित लग्न एन्जॉय करता आलं नसतं. कारण लग्न एकदाच होतं काम आयुष्यभर सुरुच राहतं."
शिवानी सोनारची 'तू भेटशी नव्याने' मालिका १३ डिसेंबर रोजी संपली. सहाच महिने मालिका चालली. सुबोध भावे यामध्ये मुख्य भूमिकेत होता. तर अंबर गणपुलेच्या 'दुर्गा' मालिकेचा ५ जानेवारी रोजी शेवटचा एपिसोड प्रसारित झाला.