नुकतंच एक मराठमोळं टीव्ही कपल लग्नबंधनात अडकलं. त्यांच्या प्रीवेडिंग शूट, तसंच लग्नातील फोटोंची खूप चर्चा झाली. नवरीला पाहून तर अनेकांनी तिच्या आऊटफिट, मेकअपचं कौतुक केलं. तसंच नवराही खूप हँडसम दिसत होता. पण ही अभिनेत्री पूर्वी इतरांच्या ब्राइडल मेकअपच्या ऑर्डर घ्यायची असा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीत केला. कोण आहे ती अभिनेत्री?
काही दिवसांपूर्वीच सुबोध भावेसोबत मालिकेत लीड रोलमध्ये झळकलेली ही अभिनेत्री आहे शिवानी सोनार (Shivani Sonar). काही दिवसांपूर्वीच ती अभिनेता अंबर गणपुलेसोबत (Ambar Ganpule) लग्नबंधनात अडकली. तेव्हा अंबर 'दुर्वा' मालिकेत दिसत होता. दोघंही टीव्ही विश्वात लोकप्रिय आहेत. लग्नानंतर त्यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी शिवानीने लग्नाची शॉपिंग आणि किस्से सांगितले. ती म्हणाली, "मी आधी इतरांचे ब्राइडल मेकअप करायचे. मी अनेक नवरींना तयार केलं होतं. त्यामुळे मला गोष्टी माहित होत्या. पण तेव्हा मी कधीच हे नव्हतं ठरवलं की माझ्या लग्नात मी याच रंगाची साडी नेसेन, असेच दागिने घालेन, अशीच हेअरस्टाईल करेन. माझं असं होतं की प्रवाहात जसं घडेल तसं घडू दे. मला अंबरने मला सांगितलं की त्याला मला हिरवी साडी, नथ, चंद्रकोर आणि हनुवटीवर तीळ अशा लूकमध्ये बघायचं आहे. त्यामुळे मग ठरलं की ठिके हेच करायचं. अशा प्रकारे माझा विधींचा लूक फिक्स झाला. मग बाकीच्या फंक्शनचं फायनल होत गेलं."
अंबरने त्याच्या नवरीचा लूक असाच का हवा याचं कारणही या मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाला, "माझ्या ते डोक्यात होतंच. मी एकदा माझ्या आईवडिलांच्या लग्नाची कॅसेट बघत होतो. त्यात आई विधींवेळी हिरव्या साडीत खूप सुंदर दिसत होती. मग मला वाटलं की शिवानीनेही तसंच यावं. म्हणून मी फक्त ही एक मागणी तिच्याकडे केली होती."
शिवानी सोनार 'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहोचली. तर अंबरने 'रंग माझा वेगळा' मध्ये भूमिका साकारली होती. नंतर लग्नाच्या आधी शिवानी 'तू भेटशी नव्याने' मालिकेत मुख्य भूमिकेत होती तर अंबर 'दुर्वा' मालिकेत लीड रील भूमिकेत होता. लग्नाआधीच दोघांची मालिका संपली. २१ जानेवारी २०२५ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले.