'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने संजिवनी ही भूमिका साकारली होती. शिवानीला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. लवकरच शिवानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने अंबर गणपुळेसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता तिची लगीनघाई सुरू आहे.
शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वैयक्तिक आणि करिअर अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. नुकतीच तिची आणि अंबरची बॅचलर्स पार्टी पार पडली. आता सध्या शिवानी तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये बिझी आहे. शिवानी तिच्या लग्नात पणजीची नथ घालणार आहे. ही नथ तिने पुन्हा नव्याने विणून घेतली आहे. याचा व्हिडिओ शेअर करत शिवानीने पोस्ट लिहिली आहे.
दागिने ही स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची गोष्ट. आणि एखादा दागिना घडवत असताना तो पाहणं ह्याच्या सारखं दुसरं सुख नाही… त्यात नथ म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय…
पण ही नथ माझ्यासाठी जास्त खास आहे. कारण ही नथ माझ्या आजीच्या आईची…तिने तिच्या लग्नात घातली… मग माझ्या आजीने तिच्या लग्नात… आणि आता मी माझ्या लग्नात ही नथ घालणार…. थोडी जुनी झाली होती त्यामुळे नव्याने विणून घ्यावी लागली….
आडनाव सोनार असलं तरी आजपर्यंत दागिना घडताना पाहिलं नव्हतं… ह्या निमित्ताने तेही पुर्ण झालं… माझ्यासाठी सगळ्यात जास्त special दागिना आहे हा…कारण अंकईकर आजोबांनी खूप प्रेमाने विणलेली नथ आहे ही...ह्यात पणजी आजीचे आणि माझ्या आजीचे आशीर्वाद आहेत.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही नथ घडत असताना आई ज्या अभिमानाने माझ्या कडे बघत होती, ती नजर मी कधीच नाही विसरू शकणार.
आई माझ्याकडे अशी बघत होती जणू तिला कोणीतरी BEST AAI असं Award दिलंय. बाकी, जुने आणि पारंपरिक दागिने घालून मिरवायची मजा काहीतरी वेगळीच आहे…♥️
शिवानी आणि अंबर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दरम्यान, शिवानी 'तू भेटशी नव्याने' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.