मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात पोहोचली. श्रेयाने अभिनय, टॅलेंट आणि विनोदबुद्धीच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावलं. 'चला हवा येऊ द्या'मुळे श्रेया घराघरात पोहोचली. खरं तर याआधी तिने काही मालिकांमध्ये काम केलं होतं. मात्र या शोने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. पण, 'चला हवा येऊ द्या'मध्ये काम करणं सुरुवातीला श्रेयाला थोडं कठीण गेलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने यामागचा एक प्रसंग सांगितला.
श्रेयाने नुकतीच जयंती वाघधरेच्या आयुष्याची जय या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यामध्ये तिला आयुष्यातील अशी मोमेंट कोणती याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा श्रेयाने 'चला हवा येऊ द्या'चा प्रसंग सांगितला.
'चला हवा येऊ द्या'बाबत काय म्हणाली श्रेया बुगडे?
"मला असं वाटतं की माझा स्ट्रगल खूप जास्त होता. त्यामुळे अशा मोमेंट्स खूप आल्या असतील. कारण, मी माझ्या आयुष्याची सुरुवातच खूप लवकर केली. मी ८ वर्षांची असताना इंडस्ट्रीत पाऊल टाकलं. पण, एखादी वेळ अशी असते की तिथे तुमचं मन तुम्हाला एक सांगत असतं आणि तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं असतं. 'चला हवा येऊ द्या' सुरू असताना सुरुवातीच्या काळात एक पॉइंट असा आली की मला वाटत होतं की मला जे करायचंय ते मला इथे करता येत नाहीये. मला माझी जागा सापडत नव्हती. कारण, सगळेच दिग्गज होते आणि त्यांच्या कामात ते वाघ होते. सगळे मुरलेले होते. आणि मी नवीन होते. त्यांच्यातून मी माझी जागा बनवण्याचा प्रयत्न करत होते".
"एक रात्र अशी होती, जेव्हा मला वाटलं की जे मला करायचंय ते मिळत नाहीये. मी गाडीत बसले आणि खूप रडले. मी आईला फोन केला आणि तिला सांगितलं की मला जे हवंय ते नाही मिळतेय. कलाकार म्हणून आपण कायम इतके भुकेलेले असतो की ती भूक भागली तर आपल्याला असं वाटतं काहीच घडत नाहीये. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. तेव्हा आई मला म्हणाली की हे जर तुझ्या आयुष्यात आलंय तर त्यामागे काहीतरी नक्कीच कारण आहे. त्यामुळे थोडं थांब..आपण बघुया काय होतंय. पण, जर तिथे मी कच खाल्ली असती तर मी आज इथे नसते".