बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. कोल्हापूरची लवंगी मिरची या नावाने लोकप्रिय असलेली सोनाली चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. काही मोजक्या मालिकांमध्ये झळकलेल्या सोनालीचा गेल्या काही काळात इंडस्ट्रीतील वावर कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ती मोठ्या दणक्यात पडद्यावर कमबॅक करत आहे.
आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'गाथा नवनाथांची' मालिकेतून अक्काबाई हे पात्र साकारणार आहे. नुकताच तिचा या मालिकेतील फर्स्ट लूक समोर आला असून ती सध्या चर्चेत येत आहे.
छोट्या पडद्यावर सध्या 'गाथा नवनाथांची' ही पौराणिक मालिका चांगलीच गाजत आहे. लवकरच ही मालिका ९०० भागांचा टप्पा पार पाडणार आहे. आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचा अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला हे सगळं प्रेक्षकांना अनुभवता आलं. सध्या नागनाथांचा प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टींविरुद्ध लढा सुरू आहे तर दुसरीकडे नागनाथ आणि भर्तरीनाथ यांचावर होणारे संस्कार पाहायला मिळताहेत. यामध्येच आता मालिकेत अक्काबाईंची एन्ट्री होणार आहे.
अक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहणार असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहे. अक्काबाईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे तयार होणार आहेत. अक्काबाई ही अघोरी स्त्री आहे. ती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहे. त्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे तयार होतील. नाथांचे कार्य हे चांगली शिकवण देणे आणि नाथ परंपरा कायम ठेवणे हे आहे. पण आता अक्काबाईच्या गावात येण्याने भरपूर अडथळे निर्माण होतील. नाथ तिला कसे सामोरे जाणार, हे प्रेक्षकांना आता मालिकेत पाहायला मिळेल.