Madhavi Nimkar: चित्रपट असो किंवा मालिका त्यामध्ये नायकासह खलनायकाला सुद्धा तितकंच महत्वाचं मानलं जातं. कथानकात रंजक वळण येण्यासाठी खलनायक महत्वाचा असतो. मालिकाविश्वात अशी अनेक नावं आपल्या समोर आहेत. दरम्यान, मालिकाविश्वात खलनायिकांची पात्रे साकारुन अनेक नायिका घराघरात पोहोचल्या. त्यामध्ये माधवी निमकर (Madhavi Nimkar) हे नाव आवर्जून घेतलं जातं. वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये खलनायिकेच पात्र साकारुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. अलिकडेच अभिनेत्री 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत पाहायला मिळाली. काही महिन्यापूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यात आता एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे माधवी निमकर चर्चेत आली आहे.
नुकतीच माधवी निमकरने 'फिल्म सिटी मुंबई' पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये माधवी म्हणाली, "प्रत्येक पुरुष वाईट असतो असं मी कधीच म्हणणार नाही. अरे, पुरुष असेच असतात, असं बोलणं चुकीचं आहे. पुरुष हे चांगलेच असतात. मला माझा भाऊ आहे वडील आहेत, माझ्या नातेवाईकांमध्ये माझे काका आहेत. ही सगळी पुरुष मंडळीच आहेत ना, आणि ते सगळे चांगले आहेत. मी बघितलं माझे वडील आईची कशी काळजी घेत होते. तिला काय हवंत ते पटकन आणून द्यायचे. हे काही खायचं काम नाही."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "आज प्रत्येकजण कमावतो आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की बाहेर जाऊन दगदग करुन घरी पैसे आणणं, ही खायची गोष्ट आहे का? तर त्या वेळेला पुरुषाला फक्त शांतता आणि प्रेमाचे दोन शब्द हवे असतात. हे महिलेने आणि पुरुषानेसुद्धा सांभाळून घेतलं पाहिजे. हे समजुतीवर अवलंबून आहे. ज्यावेळेला तुमच्या पार्टनरचा त्रास किंवा थकणं जेव्हा तुम्ही स्वत: हून अनुभवता तेव्हा या गोष्टी आपल्याला समजतात." असं तिने सांगितलं.