Surekha Kudachi: सुरेखा कुडची (Surekha Kudachi) या मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. सुरेखा कुडची 'बिग बॉस मराठी- ३' मध्येही सहभागी होत्या. 'फॉरेनची पाटलीण', 'पहिली शेर - दुसरी सव्वाशेर - नवरा पावशेर' अशा सिनेमांमध्ये सुरेखा कुडची यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं आहे.
नुकतीच सुरेख कुडची यांनी 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना साऊथ इंडियन कुटुंबात जन्म झाला असून तुमचं मराठी एकदम उत्तम आहे. हे कसं काय जमलं? त्याबद्दल सांगताना सुरेखा कुडची म्हणाल्या, "पनवेलमध्ये राहताना आमच्या आजूबाजूला मराठी मंडळी होती. आता मराठी इंडस्ट्रीत काम करुन मला जवळपास ३० वर्ष होतील. १९९७ ला माझा पहिला चित्रपट आला होता. त्याचबरोबर थोडंस व्याकरण चुकलं तरी इतकी वर्षात आपल्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांमुळे त्यात सुधारणा होतेच."
पुढे एक किस्सा सांगताना सुरेखा कुडची म्हणाल्या, "माझ्या मराठीवर हसलंही गेलं होतं आणि असंही बोललं गेलं होतं की तुझं इथे काहीच होणार नाही. तू जा आणि बापाला सांग आणि लग्न करुन मोकळी हो. असं कोणीतरी मला संपूर्ण युनिटसमोर बोलून दाखवलं होतं. तेव्हा खूप रडले होते. मग त्यावेळी मी मनाशी ठरवलं की मला करुन दाखवायचं आहे आणि मी ते करुन दाखवलं"
वर्कफ्रंट
सुरेखा कुडची या गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी काही गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे. 'देवयानी', 'भाग्यलक्ष्मी' 'रुंजी' तसेच अलिकडेच त्या 'पिंकीचा विजय असो' मालिकेत झळकल्या.