Surekha Kudachi: सुरेखा कुडची (Surekha Kudachi) या मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. अनेक मराठी चित्रपट तसंच मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजवर अनेक मालिकांमध्ये आपण सुरेखा कुडची यांना खलनायिकेच्या रुपात पाहिलं आहे. याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. त्यातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपला अभिनय प्रवास आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं.
सुरेखा कुडची यांनी नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, सुरेखा कुडची यांनी नवरा गेल्यावर एकटीने लेकीचा सांभाळ करतानाचे प्रसंग सांगितले. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, "त्यावेळेला मी माझ्या पायावर उभी होतेच पण, तो गेल्यानंतर मला असं वाटलं की आता सगळं संपलं. मी एकटी आणि पदरात तीन वर्षांची मुलगी होती. कसं मी हिला वाढवणार आहे असं वाटायचं. असंही नव्हतं की माझ्याकडे बॅंक बॅलेन्स नव्हता. माझं स्वत: चं घर नव्हतं सगळं सेट होतं. तरी सुद्धा मला असं वाटत होतं. तीन महिने मी कोणाशी बोलत नव्हते. मी कोणाच्या संपर्कातही नव्हते. तेव्हा माझी सासूच मला म्हणाली अशीच बसून राहिलीस तर तुला वेड लागेल. तू काम कर. तिचा मला खूप सपोर्ट होता."
पुढे अभिनेत्रीने सासरच्या मंडळींविषयी बोलताना म्हणाली, "माझं सासर ना फुल फिल्मी आहे. माझे सासरे कॅमेरामॅन होते. त्यांनी दाग सारख्या चित्रपटात राजेश खन्नांसोबत काम केलंय. त्यावेळेला यश चोप्रांकडे ते असिस्टंट होते. त्यामुळे सासू मी आमच्या गप्पा वगैरे व्हायच्या. माझ्या सासरच्यांकडून मला खुप सपोर्ट होता. त्यानंतर माझ्या मुलीला साडे चार ते पाच वर्षांची होईपर्यंत माझ्या सासूने छान सांभाळलं. पण, पतीच्या निधनानंतर तीन महिन्यानंतर मी कामावर परतले. भाग्यलक्ष्मी ही माझी पहिली मालिका होती. सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करत येत नाही. कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता. आणि मी काम करत राहिले नसते तर खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली असती."