Join us

"नवरा कोमात, दादरच्या मठात जाऊन ढसाढसा रडले"; मराठी अभिनेत्रीला आलेला स्वामींचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:55 IST

गुरुवारी मठात जाऊन मन मोकळं केलं, शनिवारी नवरा गेला; अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

सुरेखा कुडची (Surekha Kudachi) या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. अनेक मराठी चित्रपट तसंच मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजवर अनेक मालिकांमध्ये त्यांना खलनायिकेच्या रुपात पाहिलं आहे. याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. त्यातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपला अभिनय प्रवास आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. 

सुरेखा कुडचींना आला स्वामींचा अनुभव

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुरेखा कुडची म्हणाल्या, "माझा नवरा फिल्मलॅबला कॅमेरामन होता. तो अचानक आजारी पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मला फोन आला आणि लगेच मुंबईत यायला सांगितलं. आमचं मुंबईत कोणीच नव्हतं. कोल्हापूरचं सासर आणि माहेर पुणे. मी मुंबईत आले तोवर तो कोमात गेला होता. बाकीच्यांना यायला दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. डॉक्टरांनी माझ्या वडिलांना सांगितलं की ही आमच्या हाताबाहेरची केस आहे. लिव्हर खराब झालं होतं त्यात त्याने ड्रिंक केलं होतं जे पसरलं होतं.  ही लास्ट स्टेज, आम्ही काहीच करु शकत नाही. आम्ही विचारलं की ट्रान्सप्लांट होईल का आणि किती खर्च येईल? ते म्हणाले २५ लाख रुपये खर्च येईल. ही गोष्ट २०१३ सालची आहे. तेव्हा एवढा खर्च खूप मोठा होता."

त्या पुढे म्हणाल्या, "मी दोन फ्लॅट घेऊन ठेवलेच होते. एक मुंबईत आणि एक कोल्हापूरमध्ये होता. काही वेळ आली तर मी घर विकेन असं मी वडिलांना सांगितलं. बरं उद्या ऑपरेशन म्हणजे आज घर विकून लगेच पैसे मिळतील इतकी काही घर विकणं सोपी गोष्ट नसते. मला काहीच सुधरत नव्हतं. मग मी दादरच्या मठात गेले. लोक मला ओळखत असतानाही मी सर्वांसमोर तिथे बसून ढसाढसा रडत होते. मी स्वामींना म्हटलं की घर विकू की नको मला निर्णय घ्यायचा आहे. मार्ग दाखवा. तीन दिवस झाले नवरा लास्ट स्टेजवर आहे. लास्ट स्टेजला आहे. कधीही जाईल अशा परिस्थितीत आहे. मी घर विकायचं की नाही याचा योग्य निर्णय घ्या. जर मी घर विकलं आणि त्याला व्यवस्थित घरी आणलं तर मग नंतर माझ्यावर ही वेळ आणू नका. माझा संसार व्यवस्थित चालू द्या. पण मी घर विकलं आणि दोन वर्षांनंतर हीच परिस्थिती आणणार असाल तर मग मला मार्ग दाखवा. हे मी गुरुवारी रात्री मठात बसून बोलले आणि शनिवारी सकाळी तो गेला. मला वाटतं हा अनुभवच आहे." 

टॅग्स :मराठी अभिनेताश्री स्वामी समर्थपरिवारटिव्ही कलाकार