अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) आणि अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकले. थेट लग्नाचा फोटो शेअर करत त्यांनी आपलं नातं जाहीर केलं. दोघंही त्याआधी काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते याचा थांगपत्ताच त्यांनी लागू दिला नाही. पियुषचं हे तिसरं लग्न असल्याने त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर निगेटिव्ह कमेंट्सही आल्या. नुकतंच सुरुची मुलाखतीत याबद्दल व्यक्त झाली आहे.
रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत सुरुचीने या विषयावर मनमोकळा संवाद साधला आहे. पियुषच्या पूर्वपत्नी जर उद्या समोर आल्या तर इनसिक्युरिटी वाटेल का असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "मनापासून सांगते मला कसलीच इनसिक्युरिटी नाही. आमच्या नात्यात सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आम्ही खूप छान मित्र आहोत. तो याच इंडस्ट्रीत काम करणार आहे त्यामुळे लोक समोर येणारच आहेत. तो इथेच काम करणार आहे आणि त्यांचं पटलं नाही म्हणूनच तर असं झालं ना. कालांतराने आपण माणूस म्हणून समजूतदार होत जातो. भांडण झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर परिस्थिती बदललेली असते. आपण तेच पकडून राहत नाही. थोडा पझेसिव्हनेस असतोच आणि तो कोणत्याही नात्यात असायला पाहिजे. पण त्याबाबतीत इनसिक्युरिटी आम्हाला दोघांना नाही कारण आम्ही दोघे खूप सारखे आहोत."
ती पुढे म्हणाली, "मी त्याला पूर्णतः स्वीकारलं आहे. जर माणूस म्हणून तो चुकीचा असता तर कोणीही त्याच्याबरोबर का असतं? तो जसा आहे ज्यासकट आहे मी त्याला स्वीकारलं आहे. त्याच्या आयुष्यात जे घडलं त्याचे परिणाम त्याला जास्त जाणवले आहेत. त्यावर आपण कोणीही बोलणं खूप सोप्पं आहे. मला त्याच्या भूतकाळाबद्दल कधीच प्रॉब्लेम नव्हता. Past is past कोणत्याही रिलेशनशिपमध्ये कोणीही चुकीचं नसतं. दोघेही चांगले आहेत पण त्याचं नाही पटत असं होऊच शकतं. सगळं परिस्थितीवर अवलंबून असतं. पटत नाही तरी अट्टाहासाने समाजासाठी का एकत्र रहावं. अशा वेळी जे लोक वेगळं होण्याचा निर्णय घेतात तो खरंच खूप धाडसी निर्णय असतो."
पियुषचं पहिलं लग्न अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत झालं होतं. २०१० साली त्यांनी लग्न केलं तर चार वर्षात २०१४ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर २०१७ साली त्याने अभिनेत्री मयुरी वाघसोबत लग्नगाठ बांधली. मात्र त्यांचाही काही वर्षात संसार मोडला. पियुष आणि सुरुची यांची भेट 'अंजली' मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिका संपल्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं.