मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून रोज चाहत्यांना भेटत होती. पण आता ती या मालिकेचा भाग नसणार हे समजल्यानंतर सगळेच निराश झाले. तेजश्रीनेही पोस्ट शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केली. आता तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच तिची आणि तेजश्रीची तुलना होणार आहे. यावर आता स्वरदाने पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे.
अभिनेत्री स्वरदा ठिगळेने (Swarda Thigale) तेजश्री प्रधानची जागा घेतली आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या सेटवरही ती पोहोचली असून शूटिंगला सुरुवात केली आहे. दरम्यान तेजश्रीच्या मालिकेतील एक्झिटमुळे सोशल मीडियावर एकंदर नाराजीचा सूर आहे. एका चाहतीने कमेंट करत लिहिले, 'प्रामाणिकपणे सांगायचं तर कलाकारांनी रिप्लेसमेंटवाल्या भूमिका स्वीकारुच नये. त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांना जास्त वेळा होणारी तुलनाच सहन करावी लागते आणि प्रेक्षकांचं रोषही ओढवून घ्यावा लागतो."
युजरच्या या कमेंटवर एका सोशल मीडिया पेजने उत्तर देत लिहिले, "हे खरं आहे. अगदी बरोबर...पण ते त्यांचं काम करत आहेत. तुलना होणारच आहे. पण आई कुठे काय करते मालिकेचंच उदाहरण घ्या. यात संजनाच्या भूमिकेत रिप्लेसमेंट आली. रुपाली सगळ्यांना आवडली म्हणजेच ते यशस्वीही झालं. त्यामुळे आता बघुया प्रेमाची गोष्टचं काय होतंय ते..."
या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर करत स्वरदा ठिगळेने लिहिले, "आजही कलेचे असे खरे चाहते आहेत म्हणून कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते. माझ्या नवीन शोला तुम्ही देत असलेल्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी तुमचे खूप आभार."
अभिनेत्री स्वरदा ठिगळेने याआधी 'सुराज्य सौदामिनी', 'माझे मन तुझे झाले' या मालिकांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने हिंदी मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.