सध्या गाजत असलेली 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मलिका सध्या रंजक वळणार आहे. अर्जुन सायलीच्या भूतकाळाचा आणि तिच्या आईबाबांचा शोध घेणार आहे. मालिकेतील सगळेच पात्र प्रेक्षकांचे लाडके आहेत. सायली-अर्जुनमधील छोटी छोटी भांडणं आणि त्यांचं प्रेम लोकांना भलतंच आवडतंय. त्यांची केमिस्ट्री हिटच आहे. तसंच मालिकेतील पूर्णा आजी म्हणजे अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांनाही भरभरुन प्रेम मिळालंय. मात्र गेल्या काही दिवसांपासून पूर्णा आजी मालिकेत दिसल्याच नाहीत, त्या कुठे काय आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला. तेव्हा त्यांची मुलगी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) माहिती दिली आहे.
तेजस्विनी पंडितने नुकतीच एक पोस्ट केली. तिने दोन ओळींची एक कविता स्वत:च्या हाताने लिहिली. 'मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है, जो घर से निकला ही नहींI' तेजस्विनीच्या या कवितेचं आणि तिच्या हस्ताक्षराचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. मात्र एका कमेंटमध्ये नेटकऱ्याने पूर्णा आजींचा प्रश्न विचारला. 'ते सगळं ठीक आहे पण आम्हाला सांग पूर्णा आजी कुठे आहे? दिसत का नाही इतक्या दिवसांपासून? ती ठीक तर आहे ना?' यावर तेजस्विनीने उत्तर दिलं, 'ती आजारी होती. आयसीयूमध्ये दोन आठवडे. पूर्ण बरी झाली की पूर्णा आजी स्क्रीनवर परत येईल!'
तेजस्विनीच्या या माहितीनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली. 'आम्हाला तीच काळजी वाटत होती. देव बरे करो आणि तिला लवकर बरे वाटो!'अशा प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली. याआधीही पूर्णा आजींना सेटवर चक्कर आली होती तरी या वयात ती त्याच ऊर्जेने काम करत आहे तिची हीच ऊर्जा मला प्रेरणा देते असं तेजस्विनीने सांगितलं होतं.
तेजस्विनी ज्योती चांदेकरांची मुलगी आहे हे खूप कमी जणांना माहित आहे. सध्या त्या पूर्णा आजी म्हणून लोकप्रिय झाल्या आहेत. तर तेजस्विनी निर्मिती क्षेत्रात उतरली आहे.