सध्या छोट्या पडद्यावर 'ठरलं तर मग' ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची ही मालिका हटके विषयावर आधारित असल्याने प्रेक्षक आवडीने बघत आहेत. मालिकेत पूर्णा आजी हे पात्रही खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी पूर्णा आजींची भूमिका केली आहे. याही वयात ज्योती चांदेकर इतकं काम करत आहेत हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतंय. याबाबतीत त्यांची मुलगी आणि अभिनेत्री,निर्माती तेजस्विनी पंडितने नुकताच एक खुलासा केला.
'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी म्हणाली,'माझी आई ६८ वर्षांची आहे. ती अजूनही खूप शूटिंग करते काम करते. अजूनही तिचा सेटवर जाण्याचा उत्साह लाघवी कमाल आहे. या वयात एवढ्या पॅशनने काम करणं, इतक्या वेळ काम करणं. सोप्पं नाही. बरं तिची दुखणी खुपणी भरपूर आहेत. तिचं स्पाइनचं ऑपरेशन झालंय. गुडघ्याचं आता केव्हाही होईल. आरोग्याच्या तक्रारी खूप आहेत.'
ती पुढे म्हणाली,'आता नुकतीच ती सेटवर चक्कर येऊन पडली सुद्धा. पण पुढच्याच दिवशी शूटिंगला गेली. ही जी ताकद आहे ना तिच्या कलेमध्ये ती मला खूप ऊर्जा देते. मी जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हा ज्योती चांदेकरांची मुलगी म्हणून आले नाही. मी तिला तेव्हाच थांबवलं होतं की मला तुझी ओळख नको. मला तुझी मुलगी म्हणून ओळखच नको.आईने जरी माझी मदत केली असती मला चित्रपट मिळवून दिला असता तरी मीच जर घाण काम केलं असतं तर पुढची कामं कशी मिळाली असती मला. म्हणून मी कधीच तिच्या नावाचा वापर केला नाही. यश अपयश दोन्ही माझंच. मी तुला कशासाठीच जबाबदार धरणार नाही.'
तेजस्विनी ज्योती चांदेकरांची मुलगी आहे हे खूप कमी जणांना माहित आहे. सध्या त्या पूर्णा आजी म्हणून लोकप्रिय झाल्या आहेत. तर तेजस्विनी निर्मिती क्षेत्रात उतरली आहे.