Join us

'तो मला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि..'; मराठी अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 2:11 PM

Marathi actress: मुळात अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही, असंदेखील ही अभिनेत्री म्हणाली.

कास्टिंग काऊच या मुद्द्यावर आजवर अनेक अभिनेत्री व्यक्त झाल्या आहेत. अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या अनुभवावर उघडपणे भाष्य केलं आहे. यामध्येच मराठमोळी अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर उर्मिला निंबाळकर हिने तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. उर्मिलाने तिच्या युट्यूब चॅनेलवर याविषयी भाष्य केलं आहे. महिलांच्या सुरक्षेविषयी काही टिप्स देत असताना तिने याविषयी सांगितलं.

"आज मी माझ्या खूप खासगी गोष्टी शेअर करणार आहे. मला अजूनही आठवतंय मुंबईला एक प्रोडक्शन हाऊस होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेले होते. अगदी नोंदी केलेलं प्रोडक्शन हाऊस असल्यासारखं तिथे पाटी वगैरे लावली होती. एका मालिकेच्या ऑडिशनसाठी मी तिथे गेले होते. वेगवेगळ्या भूमिकांसाठी ऑडिशन सुरु असल्यामुळे तिथे गर्दी होती. काही केबिन होत्या. तिथे गेल्यावर एक निर्माता मला आतल्या खोलीत जाऊया असं म्हणाला. त्यावेळी मी वयाने खूप लहान होते. पण, आतल्या खोलीत का जायचं असा प्रश्न मला पडला. बाहेर एवढी गडबड सुरु आहे तरी हा मला आतल्या खोलीत का बोलावत असेल? इथे कॅमेरा आहे, शूट सुरु आहे. मग असं काय आहे जे माझ्यासोबत त्याला बोलायचं आहे?असे बरेच प्रश्न मला पडले. मला काहीच कळत नव्हतं. त्याने गडबडीत मला आतल्या खोलीत नेलं आणि मी पण त्याच्यामागे गेले",असं उर्मिला म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मुळात अशावेळी काय करायचं हे आपल्याला कळत नाही. तिथे गेल्यावर मला तुला पर्सनली पाहायचं आहे की तू काय करता येतं. अभिनय करता येतो, आणखी काय काय करता येतं.बोलता बोलता तो उठला. तो उठल्यावर हा मला मिठी मारणार हे माझं मन मला सांगत होतं. मुळात मी आत जात असतानाच काही तरी भयानक होणार हे मला कळलं होतं तरी मी गेले. पण, सुदैवाने त्या खोलीचा दरवाजा उघडा होता त्यामुळे मी दरवाज्याचा बाजूलाच बसले. त्यामुळे तो माणूस माझ्याजवळ येणार तेवढ्यात मी पटकन तिथून पळ काढला.मी माझी बॅग उचलली. आता इथे माझं काहीही राहिलं तरी चालेल पण आणि इथून बाहेर पडूदेत असं मी म्हणाले. जवळपास सात-आठ मजले मी पळाले आणि गर्दी असलेल्या ठिकाणी येऊन थांबले. तिथे फुटपाथवर जाऊन बसले."

दरम्यान, “नंतर माझ्या कानावर आलं की, त्या माणसाला अटक झाली. ते प्रोडक्शन हाउस खोटं होतं. जो फ्लॅट होता, तो त्यांनी भाड्याने घेतला होता. तिथे सगळ्या फेक ऑडिशन होत्या. त्या माणसाने सगळ्यांना फसवलं होतं,” असा भयानक अनुभव उर्मिलाने सांगितला.

टॅग्स :उर्मिला निंबाळकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी