Join us

'पुरस्कार आज जरी जाहीर झाला असला तरी..'; लोकप्रिय अभिनेत्रीची अशोक मामांसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 1:30 PM

Varsha dandale: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळणार असल्याचं घोषित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्येच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी एक पोस्ट शेअर करत अशोक मामांचं अभिनंदन केलं आहे. सोबतच त्यांची एक जुनी आठवण सुद्धा सांगितली आहे.

काय आहे वर्षा दांदळे यांची पोस्ट

प्रिय भाई ( अशोक सराफ) Actor म्हणून मोठे आहातच पण माणूस म्हणूनही खूप मोठे आहात. फक्त एकच नाटक.. "अनधिकृत " तुमच्यासोबत करण्याचं भाग्य मला मिळालं. नाटक अल्पजीवी ठरलं पण माणुसकीचे बंध मात्र आजपर्यंत टिकून आहेत. माझ्या accident नंतर एव्हढया कार्यबाहुल्यातूनही तुम्ही आणि निर्मितीताई मला नाशिकला भेटायला आलात.. मला धीर दिलात.. तुम्ही स्वतः एका मोठ्या अपघाताला सामोरी गेला होतात. ते अनुभव तुम्ही सांगितले आणि मीही यातून सुखरूप बाहेर पडेन अशी खात्री दिलीत. आपल्या अनधिकृत नाटकात तुमच्या पात्राला एक विचित्र आजार असतो. त्याचं वय हळूहळू मागे जातो, म्हणजे 50 शी माणूस शेवटी दीडदोन वर्षाचा होतो.. तुम्ही काय अफलातून तो बदल दाखवत होतात भाई.. त्या नाटकातला तुमचा अभिनय हा आम्हा नवशिक्यांसाठी एक कार्यशाळा होती.. दुर्दैवाने ते नाटक चाललं नाही.. पण माझ्यासाठी ते नाटकं भाग्याचं ठरलं.. तालमी दरम्यांची शिस्त, मुख्य म्हणजे वेळेवर येणे, मोबाईल strikly off ठेवणे.. इतर अनावश्यक बडबड करणाऱ्या कलाकारांना शांत राहण्याचं महत्व पटवून देणे ( अरे आपली energy वाचवारे हे तुमचं वाक्य ).. आपल्या रोलचा बारकाईने अभ्यास करणे.. किती आणि काय काय सांगू.. खूप वर्ष झालीत पण अनधिकृत नाटक माझ्यासाठी आजही एक अधिकृत आठवणीचा खजिना आहे, असं वर्षा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "तुम्हाला महाराष्ट्र भूषण "पुरस्कार आज जाहीर झाला.. मनापासून अभिनंदन ..पुरस्कार आज जरी जाहीर झाला असला तरी तुम्ही आम्हा सगळ्यांचे महाराष्ट्र भूषण होतात.. आहात आणि जोपर्यंत मराठी अभिनयसृष्टी आहे तोपर्यंत राहालच. भाई तुमचं खूप खूप अभिनंदन." 

टॅग्स :अशोक सराफटेलिव्हिजनसेलिब्रिटी