Join us

मुलाने लंडनहून पाठवला केक अन् पतीने दिलं ब्रेसलेट...; विशाखा सुभेदार यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 16:41 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha घराघरात पोहोचली.

Vishakha Subhedar : 'फु बाई फू', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) घराघरात पोहोचली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. चित्रपट, नाटक तसंच मालिका या तिन्ही माध्यमात त्यांचा दांडगा वावर आहे. अशातच नुकताच काल २२ मार्चला विशाखा सुभेदार यांचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन अजूनही सुरुच आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त द दमयंती दामले नाटकाच्या सेटवर सहकलाकारांनी हे खास सेलिब्रेशन केलं. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 

नुकतीच विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांचे तसेच मित्र-मंडळींचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "गेल्या अनेक वर्षात असा वाढदिवस झाला नाही. सुरुवात रात्री माझ्या लंडनला असणाऱ्या लेकानं केली. माझ्यासाठी केक पाठवला, मग रात्री तो आम्ही कापला आणि गप्पा मारत मारत त्यावर मी ताव मारला एकटीनंच. खरंतर खूप मिस करत होते मी माझ्या लेकाला. तो लांब आहे माझ्यापासून आणि मग सकाळ झाली अनेक जणांचे फोन येत होते. दादा, वहिनी, भाचे, जावा, नंदा, दिर, माझ्या घरच्या अन्नपूर्णा, काहींचे फोन घेता आले, तर काही रिसिव्ह नाही करता आले. आणि मग सकाळी माझा नवरा आला. एक सोन्याचं ब्रेसलेट मला गिफ्ट केलं. मज्जाच वाटली मला, खूप जास्त. चक्क मला सरप्राईज दिलं त्यांनी. नाहीतर एरवी काय गिफ्ट घ्यायचं, काय नाही ते सगळं अगदी मला विचारून, मग त्यासाठी पैसे ठेवून, मग ते घेणार. पण यावेळी माझ्या नवऱ्याने सिक्सरच मारला आणि मग त्यानंतर आई घरी आली. तिच्या पाया पडले. औक्षण झालं. माझ्या बाबांचा बॉटल ग्रीन हा आवडता रंग, म्हणून मग त्यांच्या आवडीच्या रंगाचे कपडे घातले आणि मग निघाले दीनानाथच्या प्रयोगाला."

पुढे त्यांनी लिहिलंय, "प्रयोगाला सगळ्या नाटकाच्या मंडळींनी खूप छान स्वागत केलं. सगळ्यांनी विश केलं आणि छान प्रेक्षकांच्या सानिध्यात माझा वाढदिवस साजरा झाला. नाटक छान रंगलं. प्रेक्षक सुंदर दाद देत होते. अनेक लोकांनी खूप काय काय गिफ्ट आणले होते. खाण्याच्या गोष्टी... काही चॉकलेट, काही वड्या, मँगो बर्फी आणि सगळ्यात जास्त म्हणजे गजरे. मोगऱ्याचे गजरे आणि चाफा... इतका सुगंधी झाला माझा वाढदिवस काल आणि मग त्यानंतर माझी अतिशय जवळची मैत्रीण अर्चना तिचा नवरा म्हणजे मनजीत, पंढरीनाथ कांबळे, आद्या, ग्रीष्मा, अनिता कांबळे आणि आमचं पिल्लू अस्मि. तिथेच पुष्कर श्रोत्री, अमित राज, क्षितिज पटवर्धन ही मंडळी सुद्धा होती. ते सुद्धा विश करायला आले. गप्पा झाल्या. आम्ही हॉटेलमध्ये मस्त जेवणावर ताव मारला. माझ्या नवऱ्याचा सुद्धा नाटकाचा प्रयोग होता, म्हणून तो बिचारा येऊ शकला नाही आणि माझा लेक लंडनला. त्या दोघांना मी खूप मिस केलं."

असा साजरा झाला वाढदिवस

"ग्रीन house... पार्ले. खूपच चविष्ट जेवण होतं. इथे हॉटेलवाल्यांनी माझ्यासाठी केक अरेंज केला. स्वतः मालक, मालकीण, मुलं, त्यांच्या सुनबाई सगळे माझा वाढदिवस साजरा करायला, मला भेटायला आले. त्यांच्याबरोबर मग केक कापला. हॅपी बर्थडेचं गाणं लावलं त्यांनी हॉटेलमध्ये आणि त्यांनी मला ट्रीट दिली. त्यांनी माझं बिलच माफ करून टाकलं. इतका सोन्यासारखा वाढदिवस काल झाला माझा, की क्या कहना...! प्रेक्षकांच्या सानिध्यात, हशा आणि टाळ्यांच्या आवाजात, मित्र-मैत्रिणींच्या प्रेमात, खूपच कमाल दिवस गेला.आणि मला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर ज्या ज्या मंडळींनी, ज्या ज्या रसिक प्रेक्षकांनी वाढदिवसाचं विश केलं, त्या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार! आम्ही कलाकार खरंच खूप भाग्यवान असतो. आयुष्यभराचा आनंद रसिकांच्या प्रेमामुळे आमच्या आयुष्यात आलेला असतो. सगळ्यांचे पुन्हा मनापासून आभार! आणि सगळ्यात शेवटी ज्या परमेश्वराने मला हा दिवस दाखवला, त्या माझ्या देवाचे सुद्धा मनापासून आभार!..." अशी पोस्ट लिहून विशाखा यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया