बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी कांबळे त्याच्या अफलातून खेळाने सर्वांची मनं जिंकतोय. पॅडीचा फक्त खेळच नाही तर त्याच्या संभाषणचातुर्याचीही सगळीकडे वाहवा होतेय. पॅडीचं काल भाऊच्या धक्क्यावर रितेशनेही कौतुक केलं. शुक्रवारी बिग बॉसने सर्वांना एक जाणीव करुन दिली ती म्हणजे, महाराष्ट्रात अनेकांना एका वेळचं जेवायला मिळत नाही. हे ऐकताच पॅडी कांबळे ढसाढसा रडला होता. विशाखा सुभेदार यांनी हाच विषय घेऊन पॅडी कांबळेविषयी पोस्ट केली.
विशाखा सुभेदार यांनी पॅडीचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "आपला पॅडी का रडला??? खरं सांगू का..ह्यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्र मंडळींनी पाहिलाय.. अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी... पंढरीनाथ. एक किस्सा आठवला..असंच आम्ही प्रयोगाला जात होतों,रस्ता चुकला म्हणून बस थांब्यावर असलेल्या एका बाईला रस्ता विचारला, तर तिने रस्ता सांगताना अरे तुम्ही तर माझ्याच घरावरून जाणार, माझ्या घरावरून पुढे गेलात ना की मग डावीकडे वळलं की मग पुढे थोडं उजवीकडे वळले की तुमचा ठिकाणी.. असं म्हणाली. त्यावर पॅडी म्हणाला कीं अहो काकी तुमचं घर आम्हाला कुठे माहिती आहे... हसलो..त्यावर तीने हसून पुन्हा एकदा रस्ता सांगितला.."
विशाखा सुभेदार पुढे लिहितात, "आणि आम्ही थोडं पुढे गेलो.. त्यांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.. मला म्हणाला अगं आपण त्या बाईच्या घरावरनं जाणार मग आपण तिला का घेतलं गाडीत?? आम्ही मागे गेलो आणि त्या बाईला त्यांनी गाडीत बसवलं.. संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा चालल्या होत्या तिचा नवरा त्यांची मासेमारी ची बोट त्यावरचे कामगार सगळं .. तिने काही आम्हा दोघांना ओळखलं नव्हतं.. तिच आपल दर काही वाक्यानंतर चालू होतं" बाई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसले..." कधीच नाही बसले ग गाडीत.. नुसत्या गाड्या तोंडासमोरून गाड्या जायच्या,बसले कधीच नव्हते आज पहिल्यांदा बसले.. ते पण एवढ्या मोठ्या गाडीत..! मग तिला तिच्या घराजवळ उतरवलं.. आणि मग तिला पॅडी ने विचारलं, या बाईला ओळखतेस का तू? मग टीव्ही मध्ये शुभविवाह दुपारची सिरीयल लागते त्यात काम करते रागिनी.. हे सांगितल्यावर तिने ओळखलं.. साडीत वेगळ्या दिसता तुम्ही... भूमी आकाश रागिणी वांली सिरीयल.. मी तर गाडीच्या नादात होते तुमच्याकडे तस निरखून पाहिल नाही...असं म्हणाली..आभार वैगरे मागुन ती निघून गेली.."
विशाखा सुभेदार शेवटी लिहितात, "तिचा आनंद पाहून पॅडीला आनंद होत होता,आपल्या आईला सोडलं असं feel होत होतं.. त्यानंतर पुढच्या प्रवासात आम्ही दोघ ही अबोल .. त्यांन त्याच्या आईला आणि मी माझ्या बापाला कवटाळून प्रवास केला... अ सा आहे.. पॅडी! दुसऱ्याच्या सुखदुःखात साथ देणारा.. त्याची शिकवण्याची पद्धत अशीच आहे.. थोडी टोमणे मारत मारत पण एकदा का गाठ बसली कीं कायमची.. त्याचे टोमणे बोल अमृताची फळ वाटतात कारण तो फार कमी वेळा तस बोलतो. आणि गरज पडली तरच.. सुरज पहिल्या दिवसापासून बेड वर पॅडी च्या बाजूला झोपला.. त्यावेळी तर त्यांची ओळख ही नव्हती.. हा... आल्यापासून त्याची काळजी घेणे त्यात फक्त माया आहे असणार.. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठला स्वार्थ असता तर तो आज कुठल्याकुठे असता.."