Ashish Patil : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला आपल्या नृत्य कौशल्याने भूरळ घालणारा नृत्य दिग्दर्शक म्हणजे आशिष पाटील. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शक तसेच रिअॅलिटी शोमध्ये त्याने परीक्षकाची जबाबदारी देखील उत्तमरित्या सांभाळली. सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लावणी किंग म्हणून आशिषची ओळख निर्माण झाली आहे. नुकतंच आशिषने त्याच्या कलांगण नावाच्या डान्स स्टुडिओची सुरुवात केली आहे.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'बाई गं' या गाण्याचं त्याने केलेल्या नृत्य दिग्दर्शनाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. उत्तम कोरिओग्राफीच्या जोरावर आशिष पाटीलने प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला. परंतु आशिषचा इथपर्यंत प्रवास फार काही सोपा नव्हता. वेगवेगळ्या अडचणींवर मात करत त्याने आयुष्यातील हा खडतर टप्पा पार केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत त्याने एक लावणी करणाऱ्या पुरुषांकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं जातं, याबाबत खुलासा केला आहे. सेलिब्रिटी कट्टा या यूट्यूब चॅनेलवर त्याने या गोष्टीवर भाष्य केलंय. स्त्री पात्र साकारून लावणी करणाऱ्या पुरुषांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो, असं तो म्हणाला आहे. लहानपणी माझे मित्र मैत्रिणी फार कमी होते. हा मुलींसारखा वागतो, बोलतो असं काही जण बोलायचे. त्यामुळे मी माझं लक्ष अभ्यासाकडे आणि नृत्याकडे वळवलं. काहींनी तर नाच्या हे माझं टोपणनाव ठेवलं.
तीन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न-
''शाळेत असताना मी एकटाच असायचो. मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र डबा खाणं या गोष्टी मी कधीच अनुभवल्या नाही. आठवीत असताना मी पहिल्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना जेव्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एंट्री करायचो तेव्हा वेगवेगळ्या नावाने हिणवले जायचे. कल्याणनंतर मी मुंबईत राहायला आलो तिथेही या गोष्टींचा सामना करावा लागला. त्या निगेटिव्हिटीमुळे तिसऱ्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.'' असा खुलासा आशिषने या मुलाखतीत केला.
स्त्री पात्र निभावणाऱ्यांचा संघर्ष-
''पुरुष लावणी कलाकारांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो. बिन बायकांचा तमाशा असा एक कार्यक्रम होता. बिन बायकांचा तमाशा या नावातच सगळं आलं. कार्यक्रमाला येणारे लोक त्यांना पाहून अश्लील भाषा वापरायचे. संगीत, वाद्य ते नाचणाऱ्यांपर्यंत सगळे परूष असतात. स्त्री पात्र साकारणाऱ्यांकडे वेगळ्या भावनेने पाहिले जाते.
''पुरूष कलाकाराकडे खुप घाणेरड्या नजरेने पाहिलं जातं. आम्ही असे देखील किस्से ऐकलेत, शोच्या दरम्यान काही जणांवर रेप झालेत. मी सुद्धा असा स्पर्श अनुभवलाय. जी मुलं स्त्री पात्र करतात ते या गोष्टींसाठी सहज उपलब्ध असतात, असा काहींचा समज आहे. या कलाकारांना सुरक्षा मिळणं गरजेचं आहे''असं देखील आशिष म्हणाला.