'मन झालं बाजिंद' (Man Jhala Bajind) या मालिकेला राया आणि कृष्णा या दोघांचही मनाविरुद्ध लग्न झाल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. दोघांचीही इच्छा नसताना हे लग्न झाल्यामुळे आपल्यात नवरा-बायकोचं नातं नसेल हे रायाने लग्नाच्या काही दिवसांमध्येच कृष्णाला सांगितलं होतं. त्यामुळे केवळ ते इतरांसाठी नवरा-बायको असल्याचं खोटं नाटक करत होते. परंतु, या दोघांचं लग्न झाल्यापासून कृष्णावर वारंवार संकटं कोसळत आहे.यावेळीदेखील कृष्णावर असंच संकट कोसळलं असून त्यातून रायाने तिला सुखरुपपणे वाचवलं आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अपघाताच्या दिवशी नेमकं काय झालं हे आठवण्याचा प्रयत्न कृष्णा करत आहे. याचवेळी राया चुकून तिला कसं वाचवलं हे सांगणार आहे.
लग्नानंतर पहिली दिवाळी असल्यामुळे राया आणि कृष्णा कुटुंबासोबत देवीच्या दर्शनाला जातात. मात्र, परत येत असताना वाटेत त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल होतात. ज्यामुळे गाडी एका झाडावर जाऊन आदळते. परंतु, कृष्णाला कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी राया तिला गाडीतून उडी मारायला सांगतो.कृष्णाने गाडीतून उडी मारल्यानंतर ती एका नदीत पडते. ज्यामुळे नाकातोंडात पाणी गेल्यामुळे ती बेशुद्ध पडते. यावेळी कृष्णाला वाचवण्यासाठी राया तिला श्वास देतो आणि तिला वाचवतो. परंतु, ही गोष्ट कृष्णाला माहित नाही. परंतु, चुकून रायाच्या तोंडातून त्या प्रसंगाचा उल्लेख होतो आणि कृष्णाला घडलेल्या प्रसंगाची चाहूल लागते.
दरम्यान, रायाने कृष्णाचे प्राण वाचवल्यामुळे आता तरी तिचा त्याच्यावर असेलला राग कमी होईल का?त्यांच्यातील मैत्रीचं प्रेमात रुपांतर होईल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तर मालिका पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.