खरंतर दुसरीही मुलगी झाली म्हणून माऊला मुलगी म्हणून तिच्या वडिलांनी कधी स्वीकारलं नाही इतकंच काय तिचं तोंडही पाहिलं नाही. तिला लहानपणापासून हीन वागणूक मिळाली. गाईगुरांच्या गोठ्यात ती लहानाची मोठी झाली. वंशाला दिवा हवा या हट्टासापायी माऊच्या वडिलांनी आणि आजीने तिला घरापासून लांब ठेवलं. पण पोटच्या मुलाने जेव्हा दगा दिला तेव्हा विलासच्या मागे सावलीसारखी उभी राहिली ती माऊ. जिने या जगात पाऊल ठेवण्या आधीपासून फक्त आणि फक्त तिरस्कार सहन केला त्या माऊला आता मुलगी म्हणून घरात हक्काचं स्थान मिळणार आहे.
‘मुलगी झाली हो’ मालिका आता अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतल्या माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे.
माऊच्या वडिलांना आता खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच माऊला लेकीचा सन्मान देऊन त्यांनी जुनाट विचारांना झुगारुन लावलं आहे. या लाडक्या लेकीच्या तिरस्कारापायी कुणी तिचं बारसंही केलं नाही. आईने लाडाने माऊ हाक मारली आणि सर्वांचीच ती लाडकी माऊ झाली. मुलगी म्हणून मनापासून स्वीकारल्यानंतर आता माऊचं बारसं होणार आहे. माऊचं नाव नेमकं काय ठेवलं जाईल याची नक्कीच उत्सुकता असेल.
मालिकांच्या इतिहासात आजवर अशी घटना कधीही घडलेली नाही. मुलगी झाली हो मालिकेतलं हे वळण म्हणजे नव्या बदलाची नांदी म्हणायला हवं. लेखिका रोहिणी निनावे यांच्या लेखणीतून हा अत्यंत भावनिक प्रसंग लिहिला गेला आहे. मालिकेत माऊचा नव्याने जन्म होतोय असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. माऊसारख्या अनेक निरागस लेकींना या मालिकेच्या निमित्ताने जगण्याची नवी दिशा मिळेल अशी आशा आहे.