गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी मालिका म्हणजे रंग माझा वेगळा (Rang Majha Vegla). उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर ही मालिका अधिकाधिक रंजक वळणावर पोहोचली. त्यामुळे या मालिकेत दररोज काय घडणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. दीपिका आणि कार्तिकी यांच्या जन्मानंतर दीपा- कार्तिक खऱ्या अर्थाने विभक्त झाले. मात्र, त्यांच्या मनात एकमेकांविषयी असलेलं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही. विशेष म्हणजे बरीच वर्ष विभक्त राहिल्यानंतर आता दीपाचा पुन्हा एकदा इनामदारांच्या घरात गृहप्रवेश होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दीपा तिच्या मुलीला कार्तिकीला घेऊन गावी गेल्यानंतर तिच्या सासूने सौंदर्या इनामदारने तिला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, दीपा सापडली नाही. परंतु, कार्तिकी आणि दीपिका यांच्यामुळे दीपा आता पुन्हा एकदा इनामदारांच्या उंबरठ्याजवळ येणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दीपा दिवाळीच्या मुहुर्तावर इनामदारांच्या बंगल्याबाहेर उभी असल्याचं दिसून येतं. इतकंच नाही. तर, त्याच वेळी सौंदर्या इनामदार तिला पाहता. सौंदर्या आणि दीपा या दोघी आमनेसामने येतात. त्यामुळे दीपाचा लवकरच इनामदारांच्या घरात गृहप्रवेश होण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर पोहोचली आहे. दीपिका आणि कार्तिकी या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. परंतु, खऱ्या आयुष्यात त्या सख्ख्या बहिणी असल्याचं त्यांना ठावूक नाही. त्यामुळे हे सत्य समोर आल्यानंतर काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.