छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं'. सध्या ही मालिका रंगतदार वळणावर आली आहे. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवत आहे. घरचा आणि कंपनीचा ताबा मिळवल्यानंतर शालिनीने तिचा मोर्चा अन्य मालमत्तेकडे वळवला आहे. यामध्येच आता ही मालमत्ता मिळवण्यासाठी तिने जयदीपसोबत कबड्डीचा डाव आखला आहे. त्यामुळे ही मालिका रंजक वळणावर आली आहे. सोबतच या मालिकेत अभिनेता मिलिंद शिंदेची एण्ट्री होणार आहे.
शिर्के-पाटलांना त्यांची मालमत्ता परत हवी असेल तर जयदीपला कबड्डीचा डाव जिंकावा लागेल अशी अट शालिनीने ठेवली आहे. त्यामुळे कबड्डीचा हा सामना जिंकणं हा एकमेव पर्याय शिर्के-पाटील कुटुंबासमोर आहे. विशेष म्हणजे कबड्डीचा सामना खेळायचा म्हणजे प्रशिक्षक हवा. त्यामुळे कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे यांची एण्ट्री होणार आहे.
"मी या मालिकेत कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. भैरु असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. मी पहिल्यांदाच प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. मी दिल्लीला शिकायला होतो तेव्हा काही शाळा आणि कॉलेजमध्ये वर्कशॉप घ्यायचो. त्याचीच मदत मला ही व्यक्तिरेखा साकारताना होतं आहे. मी कबड्डी कधीच खेळलो नाहीये. शाळेत असल्यापासून फक्त आणि फक्त नाटक केलं आहे. मला क्रिकेट खेळायला आवडतं पण मला जमत नाही. त्यामुळे ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक आहे", असं मिलिंद शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आणि या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यामुळे या मालिकेचा भाग होता आला याचा आनंद आहे."
दरम्यान, 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. त्यामुळे या मालिकेत नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर झाले आहेत.