अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ( Shivani Rangole) हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय कपल. या कपलनं आपलं नातं कधीच लपवून ठेवलं नाही. लवकरच हे क्यूट जोडपं लग्नबेडीत अडकणार आहे. यासाठी येत्या 7 मे रोजीचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. लग्नाची धामधूम सुरू झालीये. पण तूर्तास चर्चा उखाण्याची आहे. आता लग्नाआधीच उखाणा, हे कसं काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल तर हे सगळं जुळून आलं ते ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवर.होय, विराजस व शिवानी या दोघांनी अलीकडे ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवर हजेरी लावली. या शोमध्ये या जोडप्यानं खमंग पदार्थ तर बनवलेत, सोबत खमंग उखाणा सुद्धा घेतला.
नुकतंच या शोमध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे, पुष्कराज चिरपुटकर, विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी एकत्र येत ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवर धम्माल मज्जामस्ती केली. या शोचा एक खास व्हिडीओ विराजसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात त्यांच्यात उखाणा घेण्याची स्पर्धा रंगलेली दिसतेय. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेला या शोमध्ये श्रीखंड बनविण्यास सांगण्यात आलं होतं. त्याला अनुसरून विराजसने एक धम्माल उखाणा घेतला.‘किचन कल्लाकारच्या सेटवर आम्हाला करायचाय श्रीखंड,शिवानी बरोबर आहेच आहे आता घेऊ का हे भांडं,’ हा त्याचा उखाणा ऐकून सेटवर एकच हास्यकल्लोळ होतो. त्यांनतर रेणुका शहाणे उखाणा घेतात. ‘राणाजींना अजिबात आवडत नाही कावळ्यांची काव-काव, किचन कल्लाकारवर येऊन मला हवाय हा डाव’, असं त्या म्हणाल्या. हा एपिसोड येत्या बुधवारी टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे.
येत्या ७ मे रोजी विराजस आणि शिवानी यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. पुण्यात हा विवाहसोहळा पार पडणार असून त्यांच्या लग्नाला काही खास व्यक्ती आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी विराजस आणि शिवानी यांनी एका जाहिरातीसाठी लग्नाचं चित्रीकरण केलं होतं. त्यावेळेस सोशल मीडियावर शिवानी आणि विराजस यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी ते चित्रीकरण केलं होतं हे नंतर उघड झालं होतं. आता अखेर ते दोघे खरंच विवाहबंधनात अडकायला तयार आहे.