सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamaesh Laghate) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. दोघांच्याही साधेपणाचं चाहत्यांकडून कायमच कौतुक होतं. दोघांनी जेव्हा प्रेमाची कबुली दिली तेव्हा तर घराघरातील लोकांना आनंद झाला होता. यानंतर त्यांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. प्रथमेश आणि मुग्धा गाण्याच्या कार्यक्रमांसाठी सतत विविध शहरात फिरत असतात. मात्र ते जेव्हा गावच्या घरी जातात तेव्हा तिथली झलक चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतंच मुग्धाने तिच्या सासरच्या घराची झलक दाखवली आहे.
कौलारु छत, समोर गर्द झाडी, पहाटेचं धुकं अशा निसर्गरम्य वातावरणात प्रथमेशचं घर आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आरवली गावात प्रथमेश त्याच्या कुटुंबासोबत राहतो. लग्नानंतर मुग्धाही तिथेच शिफ्ट झाली आहे. मुग्धालाही कायम कोकणाची ओढ असते कारण तिचं माहेर अलिबागचं आहे. दोघंही कायम घराचे, आजूबाजूच्या परिसराचे फोटो शेअर करत असतात. प्रथमेशने तर स्वत: घरी मोदक बनवताचा व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा सर्वांनी मुग्धा किती नशीबवान आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. मुग्धा नुकतीच अंदमान दौऱ्यावरुन परत सासरी आली आहे. पहाटे घराबाहेरील गर्द झाडी, धुकं, सकाळी सुरेख दिसणारं कौलारु घर अशी झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे बघून चाहतेही सुखावले आहेत. प्रत्येकालाच आपल्या गावच्या घराची आठवण झाली आहे.
मुग्धा आणि प्रथमेश ही सर्वांची लाडकी जोडी आहे. त्यांचा सुखी संसार पाहून चाहते कायम त्यांचं कौतुक करताना दिसतात. मुग्धा केवळ २३ वर्षांची असून प्रथमेश २८ वर्षांचा आहे. मुग्धाने इतक्या लवकर लग्न का केलं असं अनेकांनी तिला विचारलं आहे. तेव्हा मुलीच्या लग्नाचं वय हे २२-२३ च योग्य आहे अशी प्रतिक्रिया तिने दिली होती. यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं.