Kiran Gaikwad: मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. त्यात आता तिच्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हा अभिनेता म्हणजे 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड आहे. अभिनेता किरण गायकवाडने काही दिवसांपूर्वीच म्हणजेच २९ नोव्हेंबरच्या दिवशी सोशल मीडियावर वैष्णवी कल्याणकर आणि त्याचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर अभिनेत्याच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल किरण-वैष्णवीचा मेहंदी सोहळा पार पडला. त्यात आता सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान, आता लवकर किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने लग्नाची तारीखही जाहीर केली. उद्या म्हणजेच १४ डिसेंबरच्या दिवशी किरण-वैष्णवी लग्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नुकताच सोशल मीडियावर किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरच्या साखरपुड्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 'सेलिब्रिटी प्रमोटर्स' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये किरण त्याची होणारी पत्नी वैष्णवीच्या हातात अंगठी घालतो आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही फारच आनंदी दिसत आहेत. साखरपुड्यासाठी किरण गायकवाडने पांढरा कुर्ता परिधान केला आहे तर वैष्णवी पोपटी रंगाची साडी नेसली आहे. त्यांच्या लग्नाबद्दल आता चाहत्यांच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
वर्कफ्रंट
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांची पहिली भेट 'देवमाणूस' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण गायकवाडने 'लागिर झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांबरोबरच अनेक मालिकांमध्ये काम केले. मराठी सिनेमांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'चौक', 'फकाट', 'बघतोस काय मुजरा कर' आणि 'डंका हरिनामाचा' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. तर वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस २' या मालिकांमध्ये काम केलंय. सध्या ती 'तिकळी' मालिकेत अभिनय करतेय.