Shalva Kinjawdekar: 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'शिवा' या मालिकांमधून अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawdekar) घराघरात पोहोचला. या मालिकांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सध्या हा अभिनेता 'शिवा' मालिकेत आशु नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.अलिकडेच शाल्व किंजवडेकरने त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरशी लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाची सगळीकडे चर्चा होती. जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शाल्व-श्रेयाने लग्न करुन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दरम्यान, लग्नाच्या महिनाभरानंतर आता शाल्वच्या पत्नीने तिच्या मुंबईच्या घरातील गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेता शाल्व किंजवडेकरची पत्नी श्रेयाने सोशल मीडियावर तिच्या गृहप्रवेशाचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यावेळी मुंबईतील घरी या जोडप्याचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं. श्रेयाच्या स्वागतासाठी तिच्या मित्रमंडळींनी खास तयारी केली होती. घरात सर्वत्र फुलांची सजावट करुन त्यांचं घरी दणक्यात स्वागत करण्यात आलं. तसेच श्रेयाचं औक्षण करुन तिने माप ओलांडल्यानंतर घरी गृहप्रवेश करण्यात आला. विशेष म्हणजे शाल्वच्या मित्रमंडळींनी हे सगळं केलं होतं. अभिनेता स्तवन शिंदे, मिताली मयेकर तसेच सिद्धार्थ चांदेकर या सगळ्यांनी श्रेयाने टॅग करत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या व्हिडीओला श्रेया डफळापूरकरने भलंमोठं असं कॅप्शन देत लिहिलंय की, मुंबई गृहप्रवेश. आमच्या मुंबईतील कुटुंबीयांनी हा क्षण खूप खास बनवला, त्यामुळे आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही आमच्या घरापासून दूर नाही. आमच्या मनात त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेम आहे...," असं लिहित हा सुंदर व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.