Join us

"आली दिवाळी,असाच कचरा दिसू दे रोज सकाळी", रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग, शशांक केतकर पुन्हा संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:02 AM

अस्वच्छतेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला, शेअर केला व्हिडीओ.

Shashank Ketkar :शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेता कायमच त्याच्या बेधडक, स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असतो. शशांक केतकर नेहमी सामाजिक समस्यांविषयी भाष्य करताना दिसतो. अलिकडेच त्याने मुंबईतील  फिल्मी सिटी बाहेरील अस्वच्छता तसेच मालाड मालवणी परिसरातील व्हिडीओ शेअर करत त्याने प्रशासनावर निशाणा साधला होता. त्याची पालिकेने तातडीने दखलही घेतली होती. 

नुकताच सोशल मीडियावर शशांक केतकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने पुन्हा एकदा अस्वच्छतेबाबत आवाज उठवला आहे. यापूर्वीही शशांकने त्याच्या सोशल मीडियावरून याच मुद्द्यावरुन भाष्य केलं आहे. पण यावेळी त्याने केलेल्या व्हिडीओची महापालिकेकडूनही गंभीर दखल घेण्यात आली. आता पुन्हा एकदा त्याने ठाण्यातील घाणेकर चौकात कचऱ्यामुळे निर्माण झालेली विदारक परिस्थिती दाखवली आहे. या व्हिडीओच्या शशांकने ठाणे मनपाला सणसणीत टोला लगावला आहे.

व्हिडीओमध्ये शशांकने म्हटलंय, "शुभ प्रभात! दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सगळीकडेच छान रोषणाई केली जात आहे, स्वच्छता केली जात आहे. आमच्या ठाण्यात सुद्धा घाणेकर चौकात खूप छान स्वच्छता आहे. मस्त, रोषणाई . तिकडे एक मोठा डिजीटल स्क्रिन आहे. तिथे अनेक राज्यकर्त्यांच्या जाहिराती असतात. बिल्डर्सचे मोठे-मोठे फ्लेस लावलेले असतात. आमच्याकडे घर घ्या, स्वस्तात घर घ्या, असं सांगितलं जातं. त्यामुळे तो चौक खूप महत्वाचा असल्यामुळे स्वच्छ ठेवावा लागतो. तशीच स्वच्छता त्याजवळचं मी जिथे राहतो तिथे मनपाने ठेवली आहे. तर ती अगदी दिवाळी तोंडावर असताना केलेली स्वच्छता तुम्हाला दाखवतो. आणि ती फक्त स्वच्छता नाही तर त्यामागे एक योजना आहे". 

सकाळी मॉर्निंग वॉकला गेला असताना त्यादरम्यान, सोसायटीच्या आजुबाजूचा परिसर दाखवत शशांकने मनपाला खडेबोल सुनावले आहेत. झाडांची सुकलेली पानं, थर्माकोल, काचेच्या बाटल्या, देवघर अशा वस्तूंचा ढीग त्याने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला आहे. व्हिडीओच्या शेवटी सत्य परिस्थिती दाखवत अभिनेता मनपाला म्हणतो, "बघा काही जमतंय का!"

या व्हिडीओला "धन्यवाद ! सर्वांनी ठरवलं तर देश असाच घाण राहू शकतो. आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू, सगळे मिळून घाण करू.आली आली दिवाळी,असाच कचरा दिसूदे रोज सकाळी". असं कॅप्शन देत अभिनेत्याने अस्वच्छतेप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकारसोशल मीडिया