Kaumudi Walokar Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अलिकडेच बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठी मनोरंजविश्वात 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या लग्नाची चर्चा होती. अखेर आज २७ डिसेंबरच्या दिवशी अभिनेत्रीने आकाश चौकसे सोबत लग्नगाठ बांधून नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नुकतेच सोशल मीडियावर कौमुदी-आकाशच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. "साथ सात जन्माची..." असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे. नववधू कौमुदी आणि आकाश या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहेत. आपल्या लग्नासाठी कौमुदी-आकाशने खास पारंपरिक पेहरावाला पसंती दिली आहे. शिवाय त्यांनी लग्नासाठी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळतंय. आकाशी रंगाची नऊवारी साडी त्यावर मराठमोळा साज असा साजशृंगार अभिनेत्रीने केला आहे. तर तिच्या पती आकाशने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केलाय. त्यामुळे अभिनेत्रीला मराठी कलाकारांसह तिचे चाहते सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे कौमुदी वलोकर प्रसिद्धीझोतात आली. अगदी गेल्या महिन्यातच कौमुदीचं केळवण पार पडलं. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या मित्रमंडळींसोबत ब्राईड टू बी पार्टी साजरी केली होती. अशातच इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अभिनेत्रीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केल्याचे पाहायला मिळाले. कौमुदीच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना देखील होती. अखेर अभिनेत्री लग्नबेडीत अडकली आहे.