Depaali Pansare: छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका चांगलीच गाजली. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा घराघरात पोहोचल्या आहे. या मालिकेतील अरुंधतीप्रमाणेच प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. दरम्यान, सुरुवातीच्या काळात या मालिकेमध्ये संजनाच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली पानसरे पाहायला मिळाली. या मालिकेद्वारे अभिनेत्री दिपाली पानसरेने मालिका विश्वात पुनरागमन केलं. मात्र, काही कारणांमुळे तिला ही मालिका सोडावी लागली. नुकतंच दिपालीने याबद्दल भाष्य केलं आहे.
नुकतीच अभिनेत्री दिपाली पानसरेने इट्स मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "आई कुठे काय करते' मध्ये मी पहिले चार महिने काम केलं आणि त्यानंतर कोविड आला. मी तेव्हा माझा मुलगा रुहानबाबत पझेसिव्ह होते. मिलिंद गवळी मला आजही म्हणतात की, 'तू १५ दिवस आधी सांगितलं होतंस लॉकडाऊन होणार आहे, की चीनमध्ये हा आजार आला आहे. कृपया तुम्ही सगळे काळजी घ्या',मग कोविड आला. कोविडनंतर रुहान दोन वर्षांचा होता आणि तो माझ्या जवळच असायचा. माझ्या मनात पहिल्यांदा ही भीती निर्माण झाली की मी सेटवर ८० लोकांमध्ये जाऊ आणि मी जर चुकून इनफेक्शन घेऊ आले तर त्याचं काय होणार? ते बाळ तर घराबाहेर सुद्धा जात नाही. शिवाय कोविडमध्ये घरकाम करणाऱ्या बायकांनी सुद्धा कामावर येणं बंद केलं. त्यामुळे माझ्यावर घरची जबाबदारी होती."
तीन वर्षांचा ब्रेक घेतला कारण...
यानंतर दिपालीने सांगितलं, "याशिवाय एकवेळ अशी आली दहिसर चेकनाका बंद होईल मग मी तेव्हा मालाडवरुन जायचे. मग तेव्हा मला तुम्ही सेटवर राहू शकता का? असं विचारण्यात आलं. मी जर सेटवर राहिले असते तर दोन वर्षांच्या मुलाचं काय होणार कारण त्याची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हतं. याच्यासाठी मी तीन वर्षांचा ब्रेक घेतला होता. त्याची काळजी घेणं हे माझं पहिलं प्राधान्य होतं. मला तेव्हा खूप लोकांनी शिव्या पण दिल्या. कारण लोक जोडले गेले होते. पण, काही पर्याय नव्हता. तसंच यामुळे माझ्यातील आई स्ट्ऱॉंग झाली आणि तिने एवढा भारी, एवढा छान सिरिअस सोडला." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
दरम्यान, दिपाली पानसरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने , 'देवयानी', 'आई कुठे काय करते' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळतेय.