Gautami Deshpande:गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेतून गौतमीने कलाविश्वात पदार्पण केलं. परंतु गौतमीला 'माझा होशील ना' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. उत्तम अभिनयाबरोबरच गौतमी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतमी तिचं मत मांडताना दिसते. नुकताच गौतमीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने मुंबईतील बेशिस्त वाहन चालकांवर संताप व्यक्त केला आहे.
गौतमी देशपांडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी म्हणाली, "मी आता बीकेसी ते विलेपार्लेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे. तिथे मी होते आणि पुढे खूप ट्रॅफिक आहे. तर आपल्याकडे काय पातळीची हुशारी आहे. लोकांनी त्या उड्डाणपुलावरून यू-टर्न घेतले आहेत. अत्यंत वेगाने जिथून गाड्या जात आहे, अशा ठिकाणाहून ते उलटे वन-वेने येत आहेत."
पुढे गौतमी म्हणते, "या अशा लोकांवर काही कारवाई होतं नाही का? किंवा काही केलं जात नाही का? मला काही कळतं नाही. कारण ते अत्यंत रासरोसपणे उड्डाणपुलावरून यू-टर्न घेऊन मागे गेलेले आहेत. ज्यामुळे पुढे जाऊन अपघात होऊ शकतो किंवा अनेक गोष्टी होऊ शकतात. आपल्याला माहितीये ना, मुंबईत ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिकमध्ये थांबायचं. हा मुर्खपणा करायचा नाही. असं करणारे तुम्ही बेअक्कल लोक आहात."