Reshma Shinde: सध्या मराठी कलाविश्वात अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या (Reshma Shinde) नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. याचं कारणही तितकंच खास आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच रेश्माच्या केळवणाचे फोटो समोर आले होते. त्यानंतर रेश्माने सोशल मीडियावर तिच्या मेहंदीचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. आता रेश्माच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या मेहंदी सोहळ्याची चर्चा सुरू असतानाच आता पारंपारिक पद्धतीने रितीरिवाजानूसार रेश्माचा हळदी सोहळा पार पडला. त्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केळवण झालं त्यानंतर मेहंदी सोहळाही झाला पण, रेश्माचा होणारा नवरा नेमका कोण आहे? याबद्दल तिने कोणतीही माहिती उघड केली नव्हती. मात्र, सोशल मीडियावर रेश्माने शिंदेने शेअर केलेल्या हळदीच्या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक पाहायला मिळते आहे.
दरम्यान, रेश्मा शिंदेने तिच्या हळदीसाठी खास दाक्षिणात्य लूक केल्याचा पाहायला मिळतो आहे. सोबतच तिच्या नवऱ्याने ट्विनिंग करत पिवळ्या रंगाचा सदरा घातलाय. हळदी समारंभासाठी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची घागरा-चोळी तसेच त्यावर साजेसे फुलांचे दागिने घातले आहेत. या पारंपरिक पेहरावात रेश्माचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय.
रेश्मा शिंदे ही मराठी मालिकाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. 'लगोरी', 'नांदा सौख्यभरे', 'चाहूल', 'बंध रेशमाचे' अशा अनेक टीव्ही मालिकांमधून तिने कलाविश्वात स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. सध्या अभिनेत्री रेश्मा शिंदे 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी नावाचं पात्र साकारत आहे.