Join us

"शंभूराजेंच्या सावलीपर्यंत पोहचण्याची मुघलांची कुवत नव्हती, पण..." माधवी निमकर काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:11 IST

माधवी निमकरने तिच्या आयुष्यातील काही कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे. 

अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) अनेक मालिका (TV Serial) व चित्रपटांमधून (Movies) प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये तिने शालिनी नावाचं पात्र साकारलं होतं.  या भुमिकेतून रसिकांच्या मनात आपली छाप उमटविली. माधवी निमकर अनेकदा चर्चेत येत असते. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माधवी निमकरने तिच्या आयुष्यातील काही कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे. 

माधवी निमकरने नुकतीच 'फिल्म सिटी मुंबई' पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये माधवीनं तिच्या आयुष्यातील काही कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे. ती म्हणाली, "मला खूप वाईट अनुभव आले आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ आपण मोकळे होते. आपल्या आयुष्यात अशा एक ते दोनच व्यक्ती असतात. एका कानाचं दुसऱ्या कानाला कळणार नाही असा विश्वास टाकून वैयक्तिक गोष्टी आपण त्यांना सांगतो. मग तीच व्यक्ती थोडे मतभेद झाल्यानंतर आपल्या गोष्टींचं हत्यार करुन आपल्याच पाठीत सुरा खुपसते".

पुढे ती म्हणाली, "हा एक ट्रॉमा आहे. महिला महिलांसाठी घातक ठरत असतील तर कुणावर विश्वास ठेवायचा. अलिकडेच छावा चित्रपट मी पाहिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या सावलीपर्यंत पोहचण्याची पण मुघलांची कुवत नव्हती. पण, शेवटी जवळच्याच माणसांनी घात केला. तर मला असं वाटतं शत्रूला घाबरण्याची गरजच नाही. आपल्याच जवळच्या माणसांकडून भीती वाटायला लागली आहे. अशाच अनुभवांमधून मी मजबूत झाले", असा खुलासा अभिनेत्रीने केला.

माधवी निमकरने २००९ साली 'बायकोच्या नकळत' या चित्रपटातून  मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर 'असा मी तसा मी' या चित्रपटात तिने काम केले. त्यानंतर नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावा धाव, संघर्ष या चित्रपटातून ती विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. माधवी निमकर मूळची खोपोलीची आहे. विशेष म्हणजे फार कमी लोकांना माहित आहे की मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे ही माधवी निमकरची मावस बहिण आहे.  

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीटेलिव्हिजनछत्रपती संभाजी महाराज