Join us

"आई-बहिणीला शिव्या दिल्या अन्..." बिग बॉस नंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:59 AM

वीणा जगताप (Veena Jagtap) ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Veena Jagtap :वीणा जगताप (Veena Jagtap) ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेने खऱ्या अर्थाने तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. सध्या अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली'  या मालिकेच्या  माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. वीणाने ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभाग घेतला होता. या पर्वामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. परंतु त्यानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याबद्दल तिने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.

नुकतीच वीणा जगतापने सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीला 'बिग बॉस'नंतर जेव्हा बाहेर आली तेव्हा तुला कौतुक आणि टीका या दोन्ही गोष्टी तू अनुभवल्या असशील, या सगळ्याचा सामना तू कसा केला? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर पहिल्या मालिका केली तेव्हा माझी लोकप्रियता कमी होती. 'बिग बॉस'नंतर लोकप्रियता काय असते हे समजलं. असं असल तरीही त्यानंतर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. या सगळ्या गोष्टींसाठी मी तयार नव्हते. 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यानंतर प्रचंड प्रेम मिळालं. पण जेव्हा पण जेव्हा ट्रोलिंग व्हायला लागलं तेव्हा तेसुद्धा मी जास्त मनावर घेतलं नाही". 

पुढे अभिनेत्री म्हणाली, "कधी कधी तर लोक एक लाइन क्रॉस करतात. माझ्या मम्मीला शिवाय बहिणीला देखील शिव्या दिल्या. एका फॅन पेजने मला त्यादरम्यान मेसेज केला होता की तू मरत का नाही, हाच मेसेज माझ्या मम्मीला देखील केला होता. तेव्हा तिलासुद्धा वाईट मेसेज यायचे. माझं असं मत आहे की, अशा पद्धतीने कधीच कोणाला बोलू नये.  कारण तुम्हाला माहीत नाही की घरची काय परिस्थिती असेल किंवा त्या घरात तीच व्यक्ती आहे जी कमावती असेल. माझे वडील २००९ मध्ये गेले. त्यानंतर माझ्या आईने आमच्यासाठी प्रचंड संघर्ष केला. आमचं शिक्षण पूर्ण केलं. जेव्हा मी या फिल्डमध्ये आले तेव्हा माझी आई मला नेहमी म्हणायची की तू जॉब कर. कारण त्यामुळे एक ठराविक रक्कम तुमच्या हातात असते. खरंतर तिला आमच्याकडून काहीच मागत नाही. तिची हौसदेखील संपली आहे, इतका संघर्ष तिने पाहिला आहे. त्यानंतर जर तुम्ही तिला म्हणत असाल की तुमची मुलगी मरत का नाही? पण ते सगळं मी खेळाडू वृत्तीने घेतलं. पण, काही गोष्टी मनाला खूप लागतात". 

टॅग्स :वीणा जगतापटिव्ही कलाकार