Join us

जुई गडकरीच्या आजारपणावर कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? आई म्हणाली, "ही सेलिब्रिटी असल्याने हॉस्पिटलमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:59 IST

अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. सध्या जुई स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. 'ठरलं तर मग' मालिकेतल्या साध्या, सोज्वळ सायलीची भूमिका साकारून ती प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अभिनेत्रीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंगही आहे. त्यामुळे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुई गडकरीच्या आई-वडिलांनी तिच्या आजारपणावर भाष्य केलं आहे. 

नुकताच जुई गडकरीसह तिच्या आई-वडिलांनी लोकमत फिल्मीसोबत खास संवाद साधला. जुई गडकरीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आजारपणांचा सामना केला. तिने बऱ्याचदा मुलाखतींमध्ये तिच्या आजारपणाबद्दल खुलासे केले आहेत. या आजारपणात जुईला पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता आणि त्यामुळे ती आई होऊ शकत नाही, असं डॉक्टरांनी तिला सांगितलं. त्यावर तिच्या आई-वडिलांनी पहिल्यांदा भाष्य केलं आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखती जुई गडकरीचे आई-वडील म्हणाले, "सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या तिघांमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नव्हती. आम्हाला माहीत होतं की, नक्की काय आहे. तिलाही माहीत होतं, कारण तिच्यापासून लपवूनही काही फायदा नव्हता. आणि शेवटी नशिबात जे लिहिलं आहे, तेच घडणार. त्यामुळे बघू काय होतंय, असं म्हटलं. तिने यासाठी सर्वात जास्त मेहनत घेतली, तिने स्वत:वर काम केलं आणि आज ती उभी राहिली आहे. ज्यासाठी डॉक्टरांनी हात टेकले होते, पण ती उभी राहिली."

पुढे जुईचे वडील म्हणाले की, "त्यामुळे ती आज सगळ्यांसमोर आहे. तेव्हा आम्ही जर टेन्शन घेतलं असतं तर जुईचं काय झालं असतं? माझं लोकांना हेच सांगण आहे की, आयुष्यात समस्या येतात, पण त्यामुळे हरून जाणं किंवा आता मी काय करणार म्हणत नैराश्यात जाणं हे करू नये. प्रयत्न केला पाहिजे."

जुईच्या आजारपणावर आईची प्रतिक्रिया

लोकमत फिल्मीसोबत बोलताना जुईची आई म्हणाली की, "मला आधी कळतंच नव्हतं की जुई जागेवरुन का उठत नाही. त्यामुळे मग मी जवळच्या आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावलं. त्यांच्या सल्ल्यानूसार तिला रुग्णालयात दाखल केलं. पण ही सेलिब्रिटी. नर्स वगैरे उपचाराआधी तिच्यासोबत फोटो काढायला येतील. त्यामुळे आम्ही तिला नेहमीच्या रुग्णालयामध्ये न नेता, दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर तिथल्या रुग्णालयातील डॉक्टर मला विचारू लागले की, काय झालं हे त्यांनाही कळलं नाही. रात्री शूटिंगवरुन आल्यानंतर जुई झोपली आणि सकाळी तिला उठताच येत नव्हतं. मी तिला हलवून उठवण्याचाही प्रयत्न केला, पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे मलाच टेन्शन आलं. रात्री उशीरा हिचं शूट असतं त्यानंतर ती रात्री घरी आली आणि झोपली. त्याच दिवशी मी सकाळी मैत्रीणींसोबत बाहेर जाणार होते."

पुढे जुईची आई म्हणाली, "हा प्रसंग घडला तेव्हा तिचे वडीलही घरी नव्हते. त्यांच्या मित्राच्या मदतीने जुईला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा मला काही कळत नव्हतं, मी फक्त रडत होते. डॉक्टर मला विचारत होते की, नक्की काय झालं? ही कशाने कोमात गेली, काही कळेच ना. डॉक्टर वारंवार विचारत होते की,नक्की काय झालंय? पण,उपचार सुरू झाल्यानंतर तिने प्रतिसाद दिला. मी त्यावेळी काहीच करू शकले नाही, कोणाला फोन देखील केला नाही. फक्त मैत्रिणीला फोन करुन कळवलं की, असं असं झालंय. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही."

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार