'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. अल्पावधीत लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या रुपालीचे आजवर असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा चाहत्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी संजना म्हणजे रुपाली आता पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.
छोट्या पडद्यावर संजना ही खलनायिकेची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणाऱ्या रुपालीचं 'देवा गणराया' हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच हे गाणं प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांना जणू ही पर्वणीच मिळाली आहे. या गाण्यात रुपालीसोबत अभिनेता चिन्मय उदगीरकरदेखील झळकला आहे.
आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. त्याप्रमाणेच या गाण्यातील जोडपेही त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन करताना दिसत आहेत. नुकतेच लग्न झालेली नववधू आधुनिक कपड्यांमध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येते. मात्र, या गावातील स्त्रिया तिचा मराठमोठ्या पद्धतीने साजशृंगार करतात. त्यानंतर हे जोडपे गणरायाची आराधना करतात. ही छोटीशी कथा या गाण्यात अतिशय सुरेख पद्धतीने मांडण्यात आली आहे. गणपतीच्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणे जरा वेगळे आहे.
https://www.youtube.com/watch?v=Z2X_K1BiTE8
लोकप्रिय गायक स्वप्नील बांदोडकर याच्या सुमधूर आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं संदीप माळवी यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर गाण्याच्या निर्मितीची केदार जोशी आणि दिग्दर्शनाची जबाबदारी आशिष नेवाळकर यांनी पार पाडली आहे.