छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीमध्येदेखील ही मालिका अव्वल स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. दिवसेंदिवस या मालिकेतील कथानक रंजकदार वळण घेत असल्यामुळे पुढच्या भागात नेमकं काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असते. यामध्येच आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. एकेकाळी संजनाचा तिरस्कार करणारी कांचन तिच्या पक्षात गेली असून या दोघींनी अरुंधतीकडे तिच्या घराचा हिस्सा मागितला आहे. स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजना आणि कांचन एकत्र आल्या आहेत. इतकंच नाही तर त्यांनी अरुंधतीकडे तिच्या नावावर असलेला घराचा हिस्सादेखील परत मागितला आहे.
अनिरुद्धने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय झाल्यानंतर तिच्याबरोबर यशदेखील देशमुखांचं घर सोडून तिच्यासोबत डोंबिवलीला गेला. इतकंच नाही तर अनिरुद्धची बाजू घेत कांचननेदेखील अरुंधतीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यामुळे अरुंधती प्रचंड दु:खी झाली.
दरम्यान, सुरुवातीला संजनाचा तिरस्कार करणारी कांचन आता अनिरुद्धच्या प्रेमाखातर तिच्याशी मैत्री करत आहे. इतकंच नाही तर या दोघींनी मिळून अरुंधतीकडून तिचं राहतं घरदेखील हिसकावून घेतलं. विशेष म्हणजे अरुंधतीदेखील कशाचाही मोह न करता तिच्या वाट्याचा हिस्सा कांचनच्या नावे करते. त्यामुळेच आता या मालिकेत कोणतं रंजकदार वळण येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.