Join us

मिलिंद गवळींसाठी 'ही' व्यक्ती करायची ५०० वेळा जप; मेधाताईंमुळे दिला जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 4:24 PM

Milind gawali: अनेकदा ते त्यांच्या भूमिकेविषयी मत मांडत असतात. यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे मिलिंग गवळी. या मालिकेत मिलिंद गवळी अनिरुद्ध ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे नकारात्मक भूमिका साकारुनही ते विशेष लोकप्रिय झाले आहेत. मिलिंद गवळी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असून अनेकदा ते त्यांच्या भूमिकेविषयी मत मांडत असतात. यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अलिकडेच मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सेटवर अभिनेत्री मेधा जांबोटकर यांच्यासोबत सेटवर कशा प्रकारचं वातावरण असतं हे सांगितलं. यावेळी सेटवरील गमती जमती सांगत असताना त्यांनी त्यांच्या सासूबाईंच्या आठवणींनाही उजाळा दिला.

"मेधाताईंचा चेहराच इतका सोज्ज्वळ आणि प्रेमळ आहे त्यांना पाहिलं की कोणालाही आपल्याला माया लावणारी, आपली एखादी मावशी किंवा आपली प्रेमळ आत्या, किंवा जीव लावणारी आपली आई असंच वाटतं. माझ्या अतिशय मायाळु सासुबाई मेधाताईं सारख्याच होत्या. मला एक्टिंगमध्ये यश मिळावं म्हणून त्या रोज माझ्यासाठी 5000 स्वामी समर्थांचा जप करायच्या. मेधाताई ना पाहिलं की मला त्यांची खुप आठवण येते, अशाच त्या पण मिश्किल होत्या. "आई कुठे काय करते "च्या सेटवर मेधाताई क्वचितच येतात, त्यांचे फार कमी सीन्स त्या घरामध्ये असतात, माझे आणि त्यांचे तर खूपच कमी, पण ज्या ज्या वेळेला मेधाताई सेटवर येतात तेव्हा, संपूर्ण सेटचं वातावरणच बदलून जातं, आमचं शूटिंग चालू असेल आणि त्यांची जर एन्ट्री झाली तर थोडावेळ शूटिंग थांबतं, गोंगाट धमाल-मस्ती सुरू होते, वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि मग शूटिंगला परत सुरुवात होते", असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "मेधाताई अरुंधतीच्या सोशिक आईंचा रोल करतात, (इतकी सोशिक आई की मी नमिताला सांगतो की माझे त्यांना त्रास देण्याचे सिन लिहू नकोस नाहीतर लोकं जोड्याने मला मारतील). पण त्या स्वतः अजिबात तशा नाहीयेत, अगदी इमोशनल सीन सुद्धा करताना त्यांचा मिश्कीलपणा चालूच असतो. हा जो आमच्या दोघांचा व्हिडिओ आम्ही काढलाय, तो त्यांच्याच डोक्यातली कल्पना आहे, आपण स्क्रीनवर कसे आहोत आणि आपण प्रत्यक्षात कसे वागतो, त्याचा आपण एक व्हिडिओ काढू असं त्या म्हणाल्या. प्रथमेश जो 2nd unit कॅमेरामॅन आहे त्यालाच त्यांनी हा व्हिडीओ काढायला सांगितला. त्या खरंच आमच्या सगळ्यांच्या stress buster आहेत....मी जेव्हा माहीमला राहत होतो, तेव्हा मेधाताईंच्या आई मनोरमा वागळे त्यासुद्धा माहीम मध्येच राहत होत्या, शितलादेवी मंदिरात त्या कधीतरी दिसायच्या, त्यांना मी लहानपणापासून टीव्हीवर पाहिलं होतं. प्रत्येक वेळेला त्या दिसल्या मी त्यांना जाऊन नमस्कार करायचो, मला त्यांच्याबरोबर काम करायचा कधी योग आला नाही पण त्यांच्या लेकीबरोबर काम करायचं भाग्य मला लाभलं, ""ऋणानुबंध" म्हणून मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो."

टॅग्स :मिलिंद गवळीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार