अखेर अरुंधतीही पडली आशुतोषच्या प्रेमात?; मालिकेत रंजकदार वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:03 AM2022-02-15T11:03:52+5:302022-02-15T11:04:24+5:30
Aai kuthe kay karte: देशमुखांचं घर सोडल्यानंतर पुन्हा एकाकी पडलेल्या अरुंधतीला आशुतोष आधार देणार आहे.
छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात काही मालिका अशा असतात ज्या अल्पावधीत लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे सध्या टीआरपीच्या शर्यतीमध्येही ती सगळ्यात पुढे असल्याचं पाहायला मिळतं. अनिरुद्धसोबत घटस्फोट झाल्यानंतर एकाकी पडलेल्या अरुंधतीच्या आयुष्यात नुकतीच तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे हा मित्र तिच्या प्रेमात असतानाच आता तीदेखील त्याच्या प्रेमात पडते की काय अशी परिस्थिती या मालिकेत निर्माण झाली आहे.
एका पोर्टलने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अरुंधती देशमुखांचं घर सोडून निघून जाते. इतकंच नाही तर तिच्या या संकट काळात तिचा मित्र आशुतोष मदत करणार आहे. त्यामुळे हळूहळू आशुतोष प्रमाणेच अरुंधतीदेखील त्याच्या प्रेमात पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अरुंधती आणि आशुतोष मुंबईबाहेर जातात. यावेळी अनिरुद्ध रेकॉर्डिंगच्या सेटवर अरुंधतीसोबत संपर्क करायचा प्रयत्न करतो. मात्र, रेकॉर्डिंगच्या सक्सेस पार्टीतून अरुंधती आणि आशुतोष कधीच निघून गेले असं अनिरुद्धला सांगण्यात येतं. त्यावरुन अनिरुद्ध अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतो. इतकंच नाही तर आई आणि घरातील अन्य जणही तिला या प्रकरणी जाब विचारण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे अरुंधती देशमुखांच्या घरातून बाहेर पडते.
दरम्यान, देशमुखांचं घर सोडल्यानंतर पुन्हा एकाकी पडलेल्या अरुंधतीला आशुतोष आधार देणार आहे. मुळात आशुतोष अरुंधतीच्या प्रेमात आहे. परंतु, प्रेमापेक्षा त्याला मैत्री जास्त प्रिय असल्यामुळे तो अरुंधतीसोबत कायम एक मित्र म्हणूनच वावरतो. मात्र, आशुतोषच्या स्वभावातील समंजसपणा, त्याच्यातील नम्रभाव हळूहळू अरुंधतीला आवडू लागला आहे. त्यामुळे आता तीदेखील त्याच्या प्रेमात पडते की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.