'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेमध्ये अव्वल स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यानंतर या मालिकेत अनेक नवनवीन घटना घडल्या आहेत. यामध्येच इशा आणि साहिल यांच्या नात्याविषयी साऱ्यांनाच माहित असेल. साहिलसाठी वाट्टेल ते करायला इशा तयार होती. परंतु, साहिलच्या विचित्र स्वभावामुळे देशमुख कुटुंबीय त्याला नकार देतात. मात्र, अरुंधतीच्या समजावण्यानंतर साहिलमध्ये कमालीचा बदल होतो. इतकंच नाही तर आता इशासोबत लग्न करता यावं यासाठी तो तिच्या घरातील प्रत्येकाची परवानगी मिळवत आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये यश आणि साहिल यांच्यात इशासोबत लग्न करण्यावरुन संवाद सुरु आहे. विशेष म्हणजे इशासोबत लग्न करायचं असेल तर प्रथम तिच्या घरातल्यांचं मन जिंकावं लागेल हे साहिलला पक्कं कळून चुकलं आहे. त्यामुळे तो सगळ्या प्रथम यशची परवानगी मिळवण्यासाठी गेला आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये साहिल, इशासोबत लग्न करता यावं म्हणून चक्क यशला प्रपोज करतो. यात यश तुला माझा मेहुणा व्हायला आवडेल?' असा प्रश्न तो यशला विचारतो. विशेष म्हणजे यशदेखील इशा आणि साहिलच्या लग्नाला परवानगी देतो. परंतु, घरातील अन्य सदस्य म्हणजे आप्पा, आजी, अरुंधती, अनिरुद्ध या लग्नाला परवानगी देतात की नाही हे मात्र,मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.