'आई कुठे काय करते' ( aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या यशच्या आयुष्यात मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. नीलच्या तावडीतून इशाची सुटका करणाऱ्या यशवर खुनाचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण देशमुख कुटुंब कोलमडून गेलं होतं. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला असून यशची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेत यश, गौरी आणि इशा त्यांच्या मित्रपरिवारासोबत पिकनिकला गेले होते. मात्र, या पिकनिकमध्ये नीलने इशासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी यशने इशाला वाचवण्यासाठी नीलवर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात जखमी झालेल्या नीलचा मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं. परिणामी, यशवर नीलच्या खुनाचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे या संकटातून यशची सुटका करण्यासाठी आशुतोषची आई पुढे सरसावते आणि त्या यशची केस कोर्टात लढतात.
दरम्यान, सुलेखाताई कोर्टात उत्तमरित्या केस लढतात आणि यशला निर्दोष सिद्ध करतात. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यशची सुटका झाल्यानंतर तो पुन्हा देशमुखांच्या बंगल्यात परततो. मात्र, यशला बऱ्याच दिवसांनी पाहिल्यानंतर कांचन आणि गौरीचे डोळे पाणावतात. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.