काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर गाजलेल्या देवमाणूस या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्येच 'देवमाणूस 2' ही मालिका टीआरपीमध्ये सर्वात पुढे असल्याचं सांगण्यात येत आहे. अलिकडेच सुरु झालेली देवमाणूस 2 मध्ये डॉ. अजितकुमार पुन्हा एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर झाला आहे. यावेळी तो नटवर सिंग या नावाने गावात वावरत आहे. इतकंच नाही तर खरंच हा देवमाणूस आहे का? असा प्रश्नही प्रेक्षकांना पडत होता. त्यामुळे अखेर या मालिकेत त्याचं उत्तर देण्यात आलं. नटवर सिंगच देवमाणूस असून या भूमिकेसाठी अभिनेता किरण गायकवाड याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. याविषयी त्याने स्वत: खुलासा केला आहे.
"जेव्हा मला कळलं कि नटवर सिंग हा राजस्थान मधला हातचलाखी करणारा माणूस आहे तेव्हा मी त्या ट्रिक्स शिकलो, जादूचे प्रयोग करण्याचे टिप्स फॉलो केल्या. राजस्थानी भाषेचं प्रशिक्षण घेतलं. आम्ही राजस्थानमध्ये शूटिंग सुरु केलं तेव्हा त्याच्या एक दिवस आधी मी तिथे मार्केटमध्ये फिरत होतो. तिथे मी लोकांचं निरीक्षण करत होतो. त्यांचा लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो, असं किरण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, त्याचसोबत नटवर सिंगच्या बायकोच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री प्रिया गौतम यांनी मला खूप मदत केली. त्या मूळच्या राजस्थानच्या असल्यामुळे त्यांच्यामुळे मला नटवर सिंग ही व्यक्तिरेखा आत्मसाद करण्यासाठी खूप मदत झाली."
'देवमाणूस 2' मध्ये नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; 'लागिर झालं जी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका
दरम्यान, 'देवमाणूस' आणि 'देवमाणूस 2' या मालिकेमध्ये अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत झळकला आहे. किरण गायकवाडने २०१७ साली ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैयासाहेबची भूमिका साकारली होती. त्यानंतर २०२० मध्ये देवमाणूस मालिकेत किरणला अजितकुमार देवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतील त्याची नकारात्मक भूमिका तुफान गाजली.