छोट्या पडद्यावर सध्याच्या घडीला अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात गेल्या काही काळात पौराणिक मालिकांच्या माध्यमातून देवांच्या, संतांच्या कथा, त्यांचं कार्य यांवर प्रकाश टाकण्यात येत आहे. सध्या सोनी मराठीवर 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांचा जीवनप्रवास, त्यांचं कार्य, महती सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे पहिल्या भागापासून लोकप्रिय झालेल्या या मालिकेत आता ज्ञानेश्वर माऊली रेड्याच्या मुखातून वेद कसे वदवून घेतात हे दाखवणार आहेत.
'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतून माउलींच्या दिव्यत्वाचं दर्शन घडविलं जात आहे. माउलींची जीवनगाथा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळते. नुकतंच माउलींना निवृत्तीनाथांकडून अनुग्रह मिळाला असून माउलींचे विविध चमत्कार आता मालिकेत बघायला मिळतील. माउली आणि भावंडं पैठणला पोचले असून मालिकेत आता माउलींचा पहिला चमत्कार बघायला मिळेल. माउली रेडयामुखी वेद वदवून घेणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर माउली आणि त्यांचे अनेक चमत्कार प्रचलित आहेत. आणि त्या सगळ्या चमत्कारांचा उलगडा मालिकेत लवकरच होणार आहे. माउली पैठणमध्ये राहू शकतील का? रेड्याच्या मुखी ते कसे वेद वदवून घेणार या सगळ्या गोष्टी १२ डिसेंबरला रंगणाऱ्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.