छोट्या पडद्यावरील 'मन झालं बाजिंद' या मालिकेला सध्या प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. रायासोबत कृष्णाचं लग्न झाल्यापासून या दोघांच्याही आयुष्यात अनेक संकट आली आहेत. मात्र, दोघांनीही मिळून त्या संकटांवर मात केली. अलिकडेच फॅक्टरीच्या नव्या मशीनचं उद्धाटन करतांना कृष्णाला शॉक लागतो आणि त्यात तिचा उजवा हात निकामी होतो. परंतु, यातूनही ती सावरायचा प्रयत्न करते. पण, आता ऐन मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान तिच्यासमोर नवं आव्हान उभं राहणार आहे.
कृष्णाला जबरदस्त शॉक बसल्यामुळे तिचा उजवा हात पूर्णपणे निकामी होतो. इतकंच नाही तर त्यामुळे तिला सीएची परीक्षादेखील देता येत नाही. त्यामुळे कृष्णा आधीच हताश झाली असते. त्यातच आता संक्रांतीच्या सणामध्ये तिचा पहिला संक्रांत सणदेखील असाच नैराश्यात जाणार आहे.
दरम्यान, लग्नानंतर पहिलाच संक्रांत सण असल्यामुळे कृष्णाला रायासोबत पतंग उडवायचा असतो. परंतु, तिचा हात निकामी झाल्यामुळे तिला पतंग उडवणं शक्य होतं नाही. मात्र, तरीदेखील ती प्रयत्न करते. विशेष म्हणजे मोठ्या शर्थीने कृष्णा हाताची हालचाल करायचा प्रयत्न करते. परंतु, हाताची हालचाल करणं आणि पतंग उडवणं हे कृष्णासमोर मोठं आव्हान असणार आहे. तसंच घरात तिच्यासाठी खास हळदीकुंकवाचा कार्यक्रमही ठेवण्यात येतो. मात्र, या कार्यक्रमात कृष्णा कशी सहभागी होणार, तिला रायासोबत पतंग उडवता येणार की नाही हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.