'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अलिकडेच नेहाला यशचं सत्य समजलं आहे. इतके दिवस ऑफिसमधील मित्र म्हणून वावरणारा यश त्याच कंपनीचा मालक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यशने एकप्रकारे विश्वासघात केला म्हणत नेहा प्रचंड नाराज झाली आहे. यामध्येच आता नेहा एक मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच यशने नेहासमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली. मात्र, त्यापूर्वीच यश ५०० कोटींच्या कंपनीचा मालक असल्याचं सत्य तिला समजतं. त्यामुळे नेहाला प्रचंड धक्का बसलेला असतो. त्यातच यशने दिशाभूल केली, तिला अंधारात ठेवलं असं म्हणत ती चांगलीच चिडली आहे. त्यामुळे तिने आता नोकरीचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहा, परीला यापुढे यशसोबत बोलायचं नाही असं बजावते. सोबतच ती या नोकरीचा राजीनामा देतीये असंही ती ठरवते.
दरम्यान, यशचं सत्य ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर आल्यानंतर यश बॉस म्हणून ऑफिसमध्ये एन्ट्री करतो. पण, त्यावेळी नेहा त्याच्याकडे पाहातदेखील नाही. इतकंच नाही तर तेव्हाच नेहा तिच्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यामुळे आता यश तिचा राजीनामा स्वीकारतो की नाही? या मालिकेत पुढे काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.