छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. सध्या या मालिकेत नेहाच्या जीवनात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. परी आणि काका-काकुंसाठी परांजपे वकिलांसोबत लग्न करायला तयार झालेल्या नेहाचं भर मांडवात लग्न मोडतं. यश परांजपेंचं सत्य समोर आणतो. त्यामुळे नेहाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून ती सावरत नाही तोच आता तिच्यावर आणखी एक आघात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑफिसमध्ये सहकारी म्हणून काम करणारा यश त्याच कंपनीचा मालक असल्याचं तिच्यासमोर येणार आहे.
परांजपेचं सत्य समोर आल्यानंतर नेहा भर मांडवात लग्न मोडते. इतकंच नाही तर यश त्यांना चांगली अद्दलही घडवतो. परंतु, लग्न मोडल्यानंतर आता परांजपे वारंवार नेहाला रस्त्यात गाठून तिला मानसिक त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर, आता यशचं सत्य ते समोर आणणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये परांजपे यशचं सत्य नेहाला सांगतांना दिसत आहेत. ज्या यशवर विश्वास ठेऊन माझ्याशी लग्न मोडलं त्या यशचं सत्य माहितीये का? असं विचारत परांजपे, यश तुम्ही काम करत असलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक असल्याचं सांगतो.
दरम्यान, परांजपेंचं हे वाक्य ऐकल्यानंतर नेहा प्रचंड हादरुन जाते. तर दुसरीकडे समीरच्या सांगण्यावरुन यश त्याचं सत्य नेहाला सांगणार आहे. परंतु, यशने सांगण्यापूर्वीच त्याचं सत्य तिला समजणार आहे. त्यामुळे नेहावर झालेला हा आघात ती कसा सहन करेल हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.