छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा'. सध्या या मालिकेत अनेक रंजक वळण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. गैरसमजामुळे एकमेकांपासून विभक्त झालेल्या दीपा आणि कार्तिकला त्यांच्या मुली जवळ आणणार आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दीपिका आणि कार्तिकी यांच्यामुळे दीपा -कार्तिक समोरासमोर आले होते. त्यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर ते एकमेकांशी संवाद साधणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दीपा आणि कार्तिक बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांशी संवाद साधतांना दिसणार आहेत. दीपाला बरं वाटत नसल्यामुळे कार्तिकी ही माहिती कार्तिकला देते. त्यामुळे तो दीपाला फोन करुन तिची चौकशी करणार आहे. परंतु, कार्तिक फोनवर दीपाशी बोलणार असल्याचं त्याला माहित नाही. तो केवळ कार्तिकीच्या आईशी बोलत असल्याचं त्याला वाटणार आहे.
दरम्यान, कार्तिकी ही दीपाची मुलगी असल्याचं कार्तिकला अद्याप माहित नाही. त्यामुळे तो एक अनोळखी व्यक्ती म्हणूच दीपासोबत बोलणार आहे. परंतु, दीपाचा आवाज ऐकल्यानंतर कार्तिकची नेमकी प्रतिक्रिया काय असेल? दीपा-कार्तिकच्या नात्याची ही नवीन सुरुवात असेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.